आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे अजय पूरकर. नशीबवान ही त्यांची मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यात त्यांनी नागेश्वर घोरपडे ही भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या निमित्तानं त्यांचा खलनायिकी अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. छोटा पडद्यावर खलनायक बनून प्रेक्षकांची मनं जिंकत असताना अजय पूरकर आता मोठ्या पडद्यावरही क्रूर खलनायकाच्या रुपात दिसणार आहे.
advertisement
अभिनेते अजय पूरकर 'अभंग तुकाराम' या सिनेमात 'मंबाजी' या नकारात्मक रूपात आपल्याला ते दिसणार आहेत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा सिनेमा 7 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. संत तुकोबांचे वाढते प्रस्थ पाहून ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखत होते त्यात मंबाजी हे आघाडीवर होते. काही ना काहीतरी कुरापत काढायची आणि संत तुकोबांना छळायचे हे त्यांचे नित्याचेच काम होते. ‘मंबाजी’ यांचा नीचपणा एवढा होता की तुकोबांना गुरुस्थानी मानणाऱ्या बहिणाबाई यांनी त्याचे वर्णन विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगी असे केलेले आहे.
'मंबाजी' या आपल्या खलनायकी भूमिकेबद्दल बोलताना अजय पूरकर म्हणाले, "याआधीच्या माझ्या बऱ्याच भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या. आजवरच्या माझ्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन एक वेगळा प्रयत्न या चित्रपटातून मी केला आहे. ही व्यक्तिरेखा कमाल ताकदीची आहे. कलाकार म्हणून स्वीकारलेली ही व्यक्तिरेखा मला खूप महत्त्वाची वाटते. कलाकार म्हणून माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी वेगळेपण कसं आणू शकतो हे महत्त्वाचं आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील या भूमिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली."