आर्ची आणि परशाचा गोड प्रवास
आपण ज्या सिनेमाबद्दल बोलत आहोत तो सिनेमा म्हणजेच सैराट. सैराटमध्ये आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू, तर परशा म्हणजे आकाश ठोसर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आर्ची एका श्रीमंत, उच्चजातीय कुटुंबातील मुलगी, तर परशा एका साध्या शेतकरी घरातील मुलगा. परशा क्रिकेट खेळण्यात हुशार, अभ्यासात तल्लख आणि मनाने स्वच्छ. पहिल्या भेटीतच त्याचं आर्चीवर प्रेम जडतं. आर्चीचं वागणं इतर मुलींपेक्षा वेगळं, आत्मविश्वासाने भरलेलं असतं.
advertisement
( Rinku Rajguru: रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती? एका सिनेमासाठी घेते एवढे मानधन? )
हळूहळू आर्चीलाही परशाबद्दल आकर्षण वाटायला लागतं आणि दोघांमध्ये गोड प्रेमकहाणी सुरू होते. पण या प्रेमात मोठा अडथळा असतो. समाजाची कट्टर विचारसरणी आणि आर्चीच्या वडिलांची दबदबा असलेली प्रतिमा.
झिंगाट गाण्याच्या आधीची प्रेमकहाणी
सिनेमात एक प्रसंग आहे, जिथे आर्चीच्या घरी पार्टी असते. घरी पार्टी आहे आपण भेटू असं सांगायला आर्ची थेट परशाला शेतात बोलावते. ट्रॅक्टर घेऊन शेतात जाते आणि पार्टीचं आमंत्रण देते. परशा आपल्या मित्रांसोबत पार्टीला जातो. आर्चीला पाहून परशा झिंगाट नाचतो. संधी साधून परशा आणि आर्ची भेटतात. कारमध्ये किस करण्यासाठी जातात आणि तिथेच सिनेमाची कथा 360 डिग्रीमध्ये फिरते. आर्ची आणि परशाला किस करताना आर्चीचे घरचे पकडतात.
झिंगाट नंतर सुरू होतो खरा संघर्ष!
आर्चीच्या कुटुंबाला तिच्या प्रेमाची माहिती मिळते आणि त्यानंतर दोघांवर संकटांचा डोंगर कोसळतो. आर्चीला कुटुंबाने घरात डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतात तर परशाला ठार मारण्याचा कट रचला जातो. मात्र, या सर्व परिस्थितीला आव्हान देत आर्ची आणि परशा घर सोडून पळून जातात.
एक स्वप्नवत आयुष्य आणि धक्कादायक शेवट!
नवीन ठिकाणी जाऊन दोघं नवीन आयुष्य सुरू करतात. संघर्ष करून जगण्याची धडपड करतात. त्यांना मूल होते आणि वाटतं की आता सगळं ठीक होईल. पण सैराटचा शेवट हा प्रेक्षकांना सुन्न करणारा असतो. आर्ची आणि परशाची हत्या होते आणि जातीयतेच्या कडव्या वास्तवावर हा सिनेमा थांबतो.
मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारा सिनेमा म्हणजे 'सैराट'! 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात प्रेक्षकांची मने जिंकली. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा सिनेमा केवळ एका प्रेमकहाणीपुरता मर्यादित नाही, तर समाजातील कटू वास्तव, जातिव्यवस्था, प्रतिष्ठेच्या नावावर होणाऱ्या अत्याचारांची जळजळीत कहाणी सांगणारा चित्रपट आहे.
'सैराट' हा पहिला मराठी सिनेमा ठरला ज्याने 100 कोटींच्या घरात कमाई केली. या चित्रपटाने प्रादेशिक सिनेमाच्या चौकटी मोडून नवा पायंडा पाडला. सैराट नंतर हिंदीत 'धडक' नावाने याचा रीमेक देखील आला, पण तो मूळ सैराटइतका हिट ठरला नाही.तब्बल 9 वर्षांनी सैराट हा सिनेमा 21 मार्च 2025 पासून रि-रिलीज करण्यात आला आहे.