एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन यांनी स्पष्ट केलं की, त्यांना कोणासमोरही स्वतःचं स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. त्या म्हणाल्या, "मी इथे कोणाला जस्टिफाय करायला आलेली नाही. प्रत्येकाची जीवनाकडे बघण्याची आपली एक धारणा असते. माझे काही दैवी ऋणानुबंध आहेत आणि मी त्याचा आदर करते. जे ट्रोल करतायत, त्यांनी आपल्या आयुष्यात खुश राहावं, मला त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही."
advertisement
सुधाजी पुढे असंही म्हणाल्या की, ज्या लाखो लोकांना माझ्या त्या अनुभूतीशी जोडून घेता आलं, तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मी एक सेल्फ मेड महिला आहे आणि दैवी आशीर्वादानेच सन्मानाने जगत राहीन.
अपघाताच्या आठवणींनाही दिला उजाळा
ट्रोल करणाऱ्यांना आरसा दाखवताना त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संघर्षाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, "जेव्हा माझा अपघात झाला आणि मी पाय गमावला, तेव्हाही लोक माझ्यावर हसले होते. 'आता डान्स करणं ही मूर्खपणाची गोष्ट आहे' असंही मला सुनावलं होतं. पण जेव्हा त्याच संघर्षाची यशोगाथा झाली, तेव्हा तेच लोक टाळ्या वाजवू लागले. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार मी तेव्हाही केला नव्हता आणि आताही करत नाही."
नेमकं काय होतं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये?
गेल्या आठवड्यात सुधा चंद्रन एका देवीच्या जागरणाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी देवीचं भजन सुरू असताना त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांना स्वतःच्या शरीरावरचं नियंत्रण उरलं नाही. कपाळावर 'जय माता दी'ची पट्टी बांधून त्या भजनाच्या तालावर हॉलमध्ये फिरत होत्या. ही त्यांची उत्कट भक्ती होती की काही आणखीनच, यावर इंटरनेटवर दोन गट पडले होते. हॉलमध्ये उपस्थित असलेल्यांनी तर त्यांना सावरण्यासाठी तिथे धाव घेतल्याचंही व्हिडिओत दिसत होतं.
सुधा चंद्रन या केवळ अभिनेत्री नाहीत, तर त्या जिद्दीचं प्रतीक आहेत. १६ व्या वर्षी पाय गमावूनही कृत्रिम पायाच्या साहाय्याने त्यांनी शास्त्रीय नृत्यात पुनरागमन केलं.
'नाचे मयुरी' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'नागिन', 'कहीं किसी रोझ', आणि 'माता की चौकी' यांसारख्या मालिकांमधून त्यांनी घराघरांत आपली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे 'माता की चौकी' मालिकेत त्यांनी देवीच्या भक्ताचीच भूमिका साकारली होती, जी त्यांच्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे.
