कोणत्याही डॉक्टरचे यश केवळ पदव्यांनी नव्हे, तर त्याच्या रुग्णांच्या जगण्या-मरण्याच्या कहाण्यांमधून मोजले जाते. मृत्यूच्या दारातून रुग्णाला खेचून आणणाऱ्या अशाच एका ध्येयवेड्या, संशोधनात स्वतःला झोकून दिलेल्या न्यूरोसर्जन डॉक्टरांची अविश्वसनीय सत्यकथा 'ताठ कणा' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जागतिक ख्यातीप्राप्त डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या विलक्षण आयुष्यावर आधारित हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
advertisement
८६ व्या वर्षीही 'ऑपरेशन'साठी सज्ज
डॉ. पी. एस. रामाणी हे आज ८६ वर्षांचे असून, आजही ते दररोज ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीसाठी सज्ज असतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून डॉक्टर होण्याचा ध्यास घेतलेल्या या व्यक्तीचे आयुष्य क्षणाक्षणाला एक नवे वळण घेणारे आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर त्यांना एका मोठ्या आरोपाला सामोरे जावे लागले. या आरोपातून सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांनी परदेशातील मोठी नोकरी सोडून मायदेशात परत येण्याचा धाडसी निर्णय घेतला.
द्वेष, असूया आणि विश्वासाची कसोटी!
डॉ. रामाणी यांनी द्वेष, असूया आणि अविश्वास यांच्याशी लढत हजारो लोकांच्या पाठीचा कणा दुरुस्त केला आणि त्यांना 'ताठ कण्याने' जगायला शिकवले. मात्र, त्यांच्या एका संशोधनाची अशी कसोटी लागली की, सगळे जग त्यांच्याकडे संशयाने पाहू लागले.
याच वेळी एका 'प्रेमाच्या' हाकेने त्यांना दुसरे एक मोठे आव्हान स्वीकारण्यास भाग पाडले. इतरांच्या पाठीच्या कण्यावर उपचार करत असतानाच, त्यांना स्वतःच्या संशोधनाचा, लोकांचा त्यांच्यावरील विश्वासाचा आणि पत्नीच्या द्विधा मनस्थितीचा कणा सांभाळावा लागला. अखेरीस, अत्यंत नाजूक परिस्थितीत त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये पाऊल टाकले... पुढे काय झाले, हीच संघर्ष, जिद्द आणि प्रेमाची उत्कंठावर्धक कहाणी म्हणजे 'ताठ कणा'!
कलाकारांची तगडी फौज
चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार यांच्यासह रवी गोसाई, संजीव जोतांगिया अशी कलाकारांची तगडी फौज आहे. 'प्रज्ञा क्रिएशन्स'चे विजय मुडशिंगीकर आणि 'स्प्रिंग समर फिल्म्स'चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्रीकांत बोजेवार यांनी लेखन तर गिरीश मोहिते यांनी दिग्दर्शन केले आहे. अविनाश-विश्वजीत यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.