नाशिक: भारतात विड्याचं पान पूर्वापार खाल्लं जातं. जेवण झाल्यानंतर तर अनेकांना पान खायला आवडतं. त्यामुळे प्रत्येक शहरात आणि अगदी गावात देखील ‘पानपट्टी’ दिसतेच. नाशिकमध्ये देखील असंच एक प्रसिद्ध पान शॉप असून इथं पान खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. आजोंबांनी सुरू केलेलं हे पान शॉप आता त्यांची तिसरी पिढी चालवत असून 30 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत विविध पानाचे प्रकार याठिकाणी मिळतात. विशेष म्हणजे या व्यवसायातून रवींद्र लहामगे हे महिन्याकाठी लाखांवर कमाई करत आहेत.
advertisement
रवींद्र यांच्या आजोबांचा नाशिकमध्ये पान विक्रीचा व्यवसाय होता. त्यानंतर त्यांचे वडील आणि स्वत: रवींद्र यांनी देखील शिक्षण घेऊन पान विक्रीचा व्यवसायच पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. आता लहामगे यांचं ‘साईछत्र पान शॉप’ नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे. पान खाण्यासाठी इथं अनेकजण आवर्जून येत असतात. 30 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत इथं पान उपलब्ध असून यातून महिन्याकाठी 1 लाखापर्यंत कमाई होत असल्याचं रवींद्र सांगतात. तसेच या व्यवसायातून 5 जणांना रोजगार देखील मिळाला आहे.
प्रेमासाठी कायपण! आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबीयांची ‘ती’ अट, इंजिनिअर जोडप्यानं करून दाखवलं!
तंबाखूविरहीत पान
अनेकजण पानात तंबाखू आणि इतर हानिकारक पदार्थ टाकून पान बनवतात. मात्र, रवींद्र यांच्या पान शॉमध्ये तंबाखूविरहीत पान मिळतं. तंबाखू, सिगारेट आणि इतर हानिकारक वस्तूंपेक्षा पान आरोग्यासाठी लाभदायी आहे. तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असताना आम्ही आवर्जून आरोग्यासाठी फायदेशीर पानाचे विविध प्रकार बनवतो. आमच्या वडिलांचाही तसाच आग्रह राहिला आहे, असे रवींद्र सांगतात.
पानांचे प्रकार
रवींद्र यांच्या पान शॉपमध्ये फक्त शुद्ध आणि आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून पान बनवले जाते. त्यांचं खोकल्यावर रामबाण लवंग पान, मघई पान हे प्रसिद्ध आहे. हे पान सर्व ड्रायफ़ूड पासून बनवले जाते. त्यामुळे ते तोंडात ठेवताच विरघळते. त्यामुळे हे मघई पान खाण्यासाठी अनेकजण आवर्जून येत असल्याचं ते सांगतात. तसेच इथे लहान मुलांसाठी खास चॉकलेट पान देखील उपलब्ध आहे.
कलकत्ता पान, बनारस पान, विडा असे सर्व प्रकारचे पान रवींद्र यांच्या पान शॉपमध्ये मिळते. महात्मा गांधी रोडवर साई छत्र पान या नावाने नाशिमध्ये हे प्रसिद्ध ठिकाण आहे.