त्वचेवरील या समस्या प्रामुख्याने बगलेखाली, मांडीच्या आतल्या बाजूस, पाठीवर, मानेवर किंवा गुडघ्यांच्या मागच्या भागात जास्त प्रमाणात दिसून येतात. या ठिकाणी सतत घाम येत असल्यामुळे त्वचा ओलसर राहते आणि त्यामुळे बुरशी किंवा इतर संसर्ग वाढतो. अशा भागांमध्ये लालसर चट्टे, खवखव, खाज किंवा रिंगवर्मसारखी लक्षणे दिसतात. काही वेळा ही खाज इतकी तीव्र होते की त्वचेवर जखमा देखील होऊ शकतात.
advertisement
Health Tips : रोजच्या चपात्यांसाठी वापरा 'हे' पीठ; बद्धकोष्ठता-मधुमेह असे अनेक त्रास राहतील दूर
या समस्येवर घरच्या घरी काही सोपे उपाय करून आराम मिळू शकतो. नारळाच्या तेलात कडुनिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून प्रभावित भागावर लावल्यास बुरशीचा नाश होतो. एलोवेरा जेल लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते. त्याचप्रमाणे, कडुनिंबाच्या पानांनी उकळलेल्या पाण्याने रोज अंघोळ केल्यास संसर्ग पसरत नाही. तुळशी आणि हळदीचा लेप देखील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे फायदेशीर ठरतो, असं डॉ. पंडित थेटे सांगतात.
पावसाळ्यात सुताचे आणि सैलसर कपडे वापरणे, नियमित अंघोळ करणे आणि शरीर कोरडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओले कपडे फार वेळ अंगावर ठेवू नयेत. घाम येणाऱ्या भागांची स्वच्छता राखावी आणि टॉवेल, अंथरुणे दररोज धुवावीत. विशेषतः ज्या भागांमध्ये त्वचा एकमेकांवर घासते अशा ठिकाणी बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असं डॉ. पंडित थेटे सांगतात.
जर ही लक्षणे सातत्याने वाढत असतील, खाजेमुळे झोप लागत नसेल किंवा चट्टे पसरत असतील, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास ही लक्षणे गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे पावसाचा आनंद घेतानाच आपल्या त्वचेचे संरक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे.