रांची : आजकाल अनेकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्नात असतात. क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचं वजन तसं नियंत्रणात असतं. मात्र कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या रातोरात वाढलेल्या 100 ग्रॅम वजनानं संपूर्ण जगाला विचारात पाडलं. एका दिवसात 3 कुस्तीपटूंना चितपट करून फायनलला पोहोचलेली विनेश फक्त या 100 ग्रॅम वजनामुळे ऑलिम्पिकमधून थेट डिसक्वालिफाय झाली. वजन नेमकं असं अचानक का वाढतं? याबाबत डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊया.
advertisement
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील सुप्रसिद्ध डायटिशियन डॉक्टर प्रभास कुमार यांनी सांगितलं की, कधीकधी असं होतं, आपण नियमितपणे व्यायाम करतो, मात्र ऐनवेळी कुठे जायचं असेल, काही कार्यक्रम असेल नेमकं तेव्हाच आपलं वजन वाढतं. मग आपल्यालाच कळत नाही, असं का होतंय. आपण व्यायाम तर उत्तम करतोय, डायटही फॉलो होतंय, मग चुकतंय कुठे?...याचं उत्तर जाणून घेऊया.
यामुळे अचानक वाढतं वजन!
डॉ. प्रभास सांगतात, आपल्या शरिरात काही हॉर्मोन्स असे असतात जे फक्त आपल्या वजनावर काम करतात. एखादं महत्त्वाचं काम असेल त्यादिवशी आपल्याला खूप टेन्शन येतं. ते काम कसं पार पडेल, व्यवस्थित होईल ना याबाबत चिंता वाटते. मग आपला आहार व्यवस्थित असो, व्यायामही नियमित असो. मात्र केवळ चिंतेमुळे आपलं वजन कमी होत नाही. उलट ते अचानक वाढू शकतं.
स्ट्रेस हे वजन वाढण्यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण. ज्यामुळे शरिरातले हॉर्मोन्स असंतुलित होतात. तर, दुसरं कारण म्हणजे शरिरात वॉटर रिटेंशन होणं. जसं खूप गोड खाणं आरोग्यासाठी घातक असतं, तसं खूप खारट पदार्थही खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्यास वॉटर रिटेंशन होतं. म्हणजे शरिरात पाणी व्यवस्थित डिटॉक्स होत नाही. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
स्ट्रेस कंट्रोल करा!
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आपलं डायट कितीही उत्तम असूद्या, पण जर आपल्याला स्ट्रेस असेल, तर वजन कमी होणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे स्ट्रेस कंट्रोल करावा, त्यासाठी मेडिटेशन हा उत्तम उपाय आहे. शिवाय जेवणात खारट पदार्थ येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.