आर्युवेदानुसार, प्रत्येक व्यक्तीला वात, पित्त किंवा कफाचा त्रास असतो. या तिघांना बॉडी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून ओळखलं. त्यामुळे तुम्ही या ब्लॉक्सना जर दूर केलं तर निरोगी राहून दीर्घायुष्य जगू शकता. उत्तम आरोग्यासाठी फक्त चांगला आहारच नाही तर व्यायाम आणि मानसिक स्वास्थाचीही गरज आहे.
जाणून घेऊयात तुम्हाला दीर्घायुषी बनवण्यासाठी काय बदल करायला हवेत ते.
advertisement
1) जंक फूड टाळा :
आजच्या फास्ट लाईफमध्ये जंक फूड आणि तळलेले, अरबट चरबट पदार्थ अनेक आजारांचं कारण बनतं आहे. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणं टाळा. यामुळे अन्न सहज पचायला मदत होईल, तुमच्या पचनक्रियेवर ताण येणार नाही. त्यामुळे यकृतासह, किडनी आणि हृदयाचं आरोग्य सुधारेल. जेवणात व्हिटॅमिन आणि प्रथिनंयुक्त पदार्थांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फायद्याच्या असतात.
2) फळं खा:
फळांमध्ये विविध पोषकतत्वं आणि जीवनसत्वं असतात. नाश्त्यामध्ये फळं खाल्ल्यास पोट भरलेलं राहायाला मदत होते. याउप्पर जर तुम्हाला भूक लागत असेलत त फळं किंवा फळांचा रस (वेगळी साखर न टाकलेला) हा तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
3) कार्बोरेटेड ड्रिंक्स टाळा:
अनेकांना जेवताना किंवा पार्टीमध्ये ड्रिंक्स घ्यायची सवय असते. मात्र जेवताना कोल्ड ड्रिंक्स, बीअर किंवा अन्य कार्बोरेटेड ड्रिंक्स घेतले तर त्याचा जेवणावर विपरीत परिणाम होतो.याशिवाय कार्बोरेटेड ड्रिंक्स हे पोटाच्या आणि पचनाच्या विविध आजारांना आमंत्रण देतात.
4) धुम्रपान सोडा:
धूम्रपानामुळे कॅन्सर होतो हे आपल्याला माहितीच आहे. मात्र फक्त कॅन्सरच नाही तर शरीराच्या विविध अवयवांवरही धुम्रपानाचा विपरीत परिणाम होतो. एका संशोधनानुसार, धूम्रपानाचं व्यसन असलेल्या लोकांच्या आयुष्यातील 10 वर्षे कमी होतात. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता 3 पटीने जास्त असते. तुम्हाला धुम्रपान करण्याची सवय असेल आणि तुम्ही ती सोडली तर तुमचं आर्युमान वाढू शकतं. अभ्यासानुसार ज्या व्यक्तींनी 35 व्या वर्षी धूम्रपान सोडलं त्यांचं आयुष्य 8.5 वर्षांनी वाढल्याचं दिसून आलं होतं.
5) तणावमुक्त राहा, चिंता करू नका:
आजच्या धकाधकीच्या जीवनाचं मुख्य कारण तणाव हेच आहे. मात्र हा तणाव दीर्घकाळ असेल तर तो तुमच्यासाठी धोकादायक आहे. तणाव आणि चिंता यांचा आपल्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही तणावाचं नियोजन करत तणावमुक्त झालात तर तुमच्या आर्युमानात नक्की वाढ होईल.
6) कमी खा :
भूक लागल्यावर खाणं म्हणजे प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती असं विनोबा भावे म्हणायचे. याचा साधासोपा अर्थ असा आहे की, आपल्या शरीराला आवश्यक तेवढंच खाल्लं तर नक्कीच फायदा होतो. आपल्यापैकी अनेकांना भूक सहन होत नाही म्हणून जास्त खाण्याची सवय असते. त्यामुळे कमी खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं.
7) झोपायची वेळ:
लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे, अशी एक म्हण आहे. कारण तुमची झोप हे तुमचं आरोग्य ठरवत असते. रात्री उशिरापर्यंत जागं राहिल्याने आपल्या शरीरावर नव्हे तर मानसिक आरोग्याचंही मोठं नुकसान होत असतं. ज्याचा विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊन तुम्ही तणाव आणि चिंता वाढू शकतात. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत फिटही असतात आणि दीर्घायुषी देखील होतात.