शिंदे यांच्या मते, घराच्या आजूबाजूची स्वच्छता हे पहिले पाऊल आहे. परिसरात झुडपे, गवत, लाकडे, प्लास्टिक किंवा इतर वस्तू साठवून ठेवलेली असल्यास ती सापांना लपण्यासाठी योग्य जागा ठरते. त्यामुळे घराजवळील जागा नेहमी कोरडी आणि मोकळी ठेवणे आवश्यक आहे. झोपडी असो वा इमारत घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणे हा एक प्रभावी उपाय आहे.
advertisement
दुसऱ्या उपायात ते सांगतात की सापांना दूर ठेवणाऱ्या वनस्पती लावाव्यात. तुळस, गेंदा, आंबेमोहोर गवत, सर्पगंधा आणि लसूण या वनस्पतींचा वास सापांना नकोसा वाटतो. त्यामुळे घराच्या दरवाज्याजवळ, खिडकीजवळ आणि अंगणात अशा वनस्पती लावल्यास साप घराच्या दिशेने येत नाहीत. हे नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय असून कोणतीही रासायनिक फवारणी न करता सापांपासून संरक्षण करता येते.
करण शिंदे पुढे सांगतात की, रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था ठेवा. साप अंधारात अधिक सहज फिरतात. घराबाहेर आणि आवारात रात्री दिवा लावल्यास साप सहज दिसू शकतो आणि संभाव्य धोका टाळता येतो. तसेच, पायाखाली काही येतंय का याची खात्री करूनच घराबाहेर पडावं विशेषतः रात्रीच्या वेळी.
तसेच शिंदे यांचा सल्ला आहे की साप दिसल्यास त्याला मारू नका. त्याऐवजी तात्काळ स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधा. सापांनाही नैसर्गिक अधिवासात राहण्याचा हक्क आहे आणि ते मानवाला सहजतेने त्रास देत नाहीत, तोपर्यंत त्यांना धक्का दिला जात नाही.
पावसाळ्यात सापांच्या वाढत्या उपस्थितीला घाबरून न जाता योग्य खबरदारी घेऊन आणि सर्पमित्रांच्या सल्ल्याने आपण घर आणि परिसर सुरक्षित ठेवू शकतो.





