आधुनिक जीवनशैली आणि ताणतणावामुळे अनेकदा चयापचय प्रक्रिया मंदावते. चयापचय राखण्यासाठी योगासनं खूप महत्त्वाची ठरतात. काही योगासनांचा नियमित सराव केल्यानं चयापचय सक्रिय राहण्यास मदत होते आणि शरीराला इतर अनेक फायदे मिळतात.
सूर्यनमस्कार म्हणजेच बारा आसनांचं एक चक्र आहे. संपूर्ण शरीर सक्रिय करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. सूर्यनमस्कार वेगानं केल्यानं हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण गतिमान होतं आणि शरीराचं तापमान वाढतं, ज्यामुळे चयापचय त्वरित सक्रिय होतो. सूर्यनमस्कारांच्या नियमित सरावानं पचन सुधारतं आणि थायरॉईड ग्रंथी सक्रिय होतात. यामुळे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय नियंत्रणात राहतं.
advertisement
Digestion: चुकीच्या सवयींमुळे पचनशक्ती होते कमकुवत, या डाएट टिप्स वाचा
पश्चिमोत्तानासन - हे आसन खोल दाब देऊन पोटाच्या अवयवांना सक्रिय करतं. पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंड यांसारखे अवयव सक्रिय होतात, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते.
तणाव कमी करण्यासाठीही पश्चिमोत्तानासन उपयुक्त आहे आणि ताणतणाव थेट चयापचय गती कमी करण्याशी जोडलेला आहे. या आसनाच्या नियमित सरावानं शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
धनुरासन - यात शरीर धनुष्याच्या आकारात असतं. हे आसन पोट, छाती आणि मानेसाठी उपयुक्त आहे. या आसनाचा संपूर्ण पचनसंस्थेला उपयोग होतो. या आसनामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात आणि पचन सुधारतं. यामुळे थायरॉईड आणि पिट्यूटरी ग्रंथी देखील सक्रिय होतात. चयापचय दर नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सच्या स्रावासाठी या आवश्यक असतात.
भुजंगासन - भुजंगासन हे उलटं झोपून करण्यासाठीचं आसन आहे. भुजंग म्हणजे साप किंवा नाग. फणा काढल्यावर साप किंवा नाग ज्या स्थितीत असतात त्या स्थितीत हे आसन करावं. यामुळे पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि पचनसंस्थांवर योग्य दाब येतो. या आसनामुळे स्वादुपिंड आणि आतडी सक्रिय होतात. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. यामुळे शरीरातील ग्लुकोजचा वापर सुधारतो. हे आसन चयापचयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे ताण आणि थकवा देखील कमी होतो आणि उर्जेची पातळी वाढते.
Mouth Ulcers: तोंडातल्या अल्सरवर घरगुती उपचार, वेदना होतील कमी, फोड होतील गायब
उष्ट्रासन - धनुरासनाप्रमाणे उस्त्रासन हे मागे वाकून करण्याचं आसन आहे. यामुळे पोट आणि घशाच्या भागांना ताण मिळतो. त्याचा थेट परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो, यामुळे चयापचय नियंत्रित राहतं. हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.
- जलद चयापचयासाठी केवळ योगासनंच नाही, योग्य आहार आणि भरपूर पाणी पिणं देखील आवश्यक आहे.
- योगासनं पात्र प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनातच करा.
- शारीरिक समस्या असतील किंवा गर्भवती असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
