फळांमध्ये व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स, फायबर्स, खनिजं अशी विविध पोषकतत्वं असतात. त्यामुळे ते खाणं फायद्याचं ठरतं. मात्र फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर - फ्रुक्टोजही असते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीसांठी कमी फ्रुक्टोज असणारी फळं किंवा ज्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजेच जी फळं खाल्ल्याने रक्तात साखर हळूहळू सोडली जाते अशी फळं खाणं फायद्याचं ठरतं. कारण कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या फळांमुळे शरीराला पोषकतत्त्वांचे फायदे तर होतातच मात्र कॅलरीज, रक्तातली साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी होतो.
advertisement
जाणून घेऊयात डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खाऊ नयेत?
डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी ही फळं धोक्याची.
आंबा : फक्त चवीमुळेच नाही तर आंब्यात असलेल्या विविध औषधी गुणधर्मांमुळे आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंब्यात असलेले अँटिऑक्सिडंट कोलन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे. यात क्वेर्सेटिन, अॅस्ट्रागालिन आणि फिसेटीन सारखे अनेक घटक असतात जे कर्करोग रोखण्यात फायद्याचे ठरतात. आंब्यात असलेल्या विविध व्हिटॅमिन्समुळे शरीराला अनेक फायदे होतात. आंब्यात फ्रुक्टोजचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे आंब्याला डायबिटीसच्या रूग्णांचा शत्रू असंही म्हटलं जातं. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी आंबा खाणं टाळावं.
द्राक्षं : द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. मात्र द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर देखील जास्त असते. त्यामुळे द्राक्ष खाल्ल्याने रक्तातल्या साखरेची पातळी वाढू शकते. डायबिटीस असलेले रूग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित प्रमाणात द्राक्षांचं सेवन करू शकतात.
चेरी आणि लिची : चेरी आणि लिची या दोन्हींमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर्स चांगल्या प्रमाणात आढळून येतात. मात्र यात फ्रुक्टोजही जास्त प्रमाणात असल्याने डायबिटीसच्या रूग्णांसाठी ही फळं धोक्याची मानली जातात.
केळी : केळ्यात फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे ती पचनासाठी फायद्याची ठरतात. मात्र यात साखर जास्त असल्याने केळी खाल्ल्यानंतर रक्तातली साखर वाढण्याची भीती असते.
सिताफळ आणि अननस : सिताफळ हे प्रचंड गोड असतात त्यामुळे सहाजिकच त्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं. अननस चवीला आंबट गोड जरी असलं तरीही त्यात फ्रुक्टोज जास्त प्रमाणात असल्याने डायबिटीसच्या रूग्णांसाठी ही फळं खाणं धोक्याचं ठरतं.
डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी फायद्याची फळं
डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी ही फळं फायद्याची.
सफरचंद : सफरचंदात फायबर चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीसच्या रूग्णांसाठी सफरचंद खाणं फायद्याचं ठरतं.
नासपाती : नासपती फळात जास्त फायबर्स आणि कमी कॅलरीज आणि कमी फॅट्स असतात. याशिवाय नासपती खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे नासपती खाणं फायद्याचं ठरतं.
संत्री: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
पेरू: पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात. याशिवाय पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तातली साखर कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात.
किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन केचा फायबर, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात.
फळं खाताना घ्या ही काळजी
- एकाच वेळी खूप फळं खाऊ नका.
- जेवण करताना फळं खाणं टाळा.
- ताजी फळं खाल्ल्याने शरीराला अधिक फायदे होतात.
- फळांच्या रसाऐवजी फळं खाण्याला प्राधान्य द्या.
डायबिटीस हा एक जीवघेणा आजार आहे. त्यामुळे नियमितपणे वैद्यकीय तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी जंकफूड टाळून सात्विक, पौष्टिक आहार घ्या. नियमितपणे व्यायाम करा म्हणजे डायबिटीस नियंत्रणात राहायला मदत होईल.