राष्ट्रसंतांच्या प्रार्थना मंदिरात एकही देवाचा फोटो नाही
श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी येथील प्रचार प्रमुख प्रकाश वाघ यांनी लोकल18 शी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रार्थना मंदिर आणि येथील सर्वच वास्तू स्वतःच्या कल्पनेतून रचल्या. येथे असणाऱ्या प्रत्येक वास्तूला अर्थ आहे. सर्वात आधी आपण प्रार्थना मंदिराबाबत माहिती जाणून घेऊ. येथील प्रार्थना मंदिर महाराजांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केले. महाद्वारातून सरळ प्रार्थना मंदिर आपल्याला दिसते. त्या प्रार्थना मंदिरात एकही देवाचा फोटो नाही. त्याठिकाणी फक्त आणि फक्त संतांचे फोटो आपल्याला दिसून येतात.
advertisement
अधिष्ठानातून कोणता संदेश मिळतो?
पुढे ते सांगतात की, मूर्तिपूजा न करता त्यांनी अधिष्ठान स्थापन केले. अधिष्ठान म्हणजे पांढऱ्या रंगाचा खादीचा तकीया आणि त्याखाली पांढरी चादर. याचा अर्थ असा की, परमेश्वराला आकार नाही. तो निराकार आहे, सर्वव्यापी आहे. तसेच या विश्वव्यापक अधिष्ठानावर कोणी भेद करू शकत नाही. तसेच कोणी वाद करू शकत नाही. कारण हे विश्वव्यापी अधिष्ठान आहे. या अधिष्ठानवरून एक प्रेरणा घ्यायची आहे की, माणूस एक आहे. धर्म एक आहे, आणि या ऐकतेच्या संकल्पनेतूनच या विश्वाला शांती मिळणार आहे, अशी शिकवण महाराजांना त्या अधिष्ठानाच्या माध्यमातून जनतेला द्यायची होती.
राष्ट्रसंतांच्या समाधीचा अर्थ काय?
प्रार्थना मंदिराच्या पुढे महाराजांची समाधी आहे. या समाधीला पुढे चार खांब आहेत. तर मागे सहा खांब आहेत. याचा अर्थ असा की, संसार हा चारप्रमाणे करा. तर परमार्थ हा सहाप्रमाणे करा. म्हणजेच मोठा करा. स्वतःच्या सुखाऐवजी आधी समाजाच्या सुखाचा विचार करा. कारण देश सुखी तर आपण सुखी असा संदेश या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी रचनेतून मिळतो, असं त्यांनी सांगितलं.