मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या तीन वर्षांत विविध पक्षांतील तब्बल 123 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक सामील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
मुंबईवर विशेष लक्ष...
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईवरही आपले लक्ष केंद्रीत केले. मुंबईतील काही आमदारांनी शिंदे यांना बंडात साथ दिली. त्यानंतर शिंदे यांनी आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळवला. मुंबईतील माजी नगरसेवकांनी हळूहळू शिंदे गटात प्रवेश करण्यास सुरुवात केली. प्रारंभी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील माजी नगरसेवकांची संख्या मोठी होती. मात्र नंतर इतर पक्षांतीलही नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली. मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाने आधीपासूनच 227 प्रभागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले.
ठाकरे गटातील सर्वाधिक नगरसेवक
शिंदे गटाने केलेल्या दाव्यानुसार, 123 माजी नगरसेवकांपैकी 76 माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आहेत. हे नगरसेवक 2002 ते 2017 च्या कार्यकाळातील आहेत. त्यापैकी 2017-2022 या कार्यकाळातील सर्वाधिक 44 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. तसेच 2012-2017 या कार्यकाळातील 33 माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. दर पंधरा दिवसांनी पक्षप्रवेश होत असून निवडणुकीच्या आधी आणखी नगरसेवक शिंदे गटात येतील, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
भाजपवर दबाव टाकण्याची खेळी?
शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने 150 आणि त्याहून अधिक जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला किती जागा येणार, याचीही चर्चा सुरू आहे.