पुण्यातील खराडी परिसरात उघडकीस आलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असताना, राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊंचे (एकनाथ खडसे) जावई या रेव्ह पार्टीत सापडल्याची माहिती माध्यमांतून समजली, असं सांगतानाच महाजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाथाभाऊंचे जावईच पार्टीचे आयोजक...
advertisement
गिरीश महाजन यांनी म्हटले की, माझ्याकडे कुठलीही आधीपासून माहिती नव्हती. काल मी पंढरपूरमध्ये होतो आणि पहाटे नाशिकला आलो. ही बातमी मला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळली, असल्याचे महाजनांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, आरोपीत आमचे नेते नाथाभाऊंचे जावई आहेत आणि तेच या पार्टीचे आयोजक होते. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असल्याचे त्यांनी सांगितले. तिथे नक्की पाच महिला होत्या की तीन, याबाबत सध्या माहिती नाही. तपासाअंती सगळं स्पष्ट होईल,” असं महाजन यांनी सांगितलं.
महाजन यांनी खडसेंवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. "कालच नाथाभाऊ चाळीसगावला गांजावर भाष्य करत होते, मग त्यांचेच जावई कसे काय सापडले? त्यांनी जावई बापूंना अलर्ट करायला हवं होतं ना?" असा टोलाही महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावला. "हे खूप मोठं प्रकरण आहे. रेव्ह पार्टी हा विषय हलकासा नाही. चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
महाजनांनी आरोप फेटाळले...
पोलिसांच्या कारवाईनंतर विरोधकांना हा राजकीय कट असल्याचे सांगत गिरीश महाजनांवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, "जे झालं आहे, ते मान्य करायला हवं. चूक कुणाची असेल, तर ती मान्य केली पाहिजे. फोन तपासले की सगळं समोर येईल. जावईला कुणी कडेवर घेऊन थोडी पार्टीला नेलं? या सगळ्या गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे. कुंभाड स्वतः फुटतं, तसंच हे प्रकरण आहे,” अशा शब्दांत महाजन यांनी प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
महाजन यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला आणि आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीचा विषय आता केवळ पोलीस कारवाईपुरता मर्यादित राहिलेला नसून, आता त्याला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.