जालना : पारंपारिक पिकांना फाटा देऊन शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. जालना जिल्ह्यातील तीन तरुणांनी एकत्र येत खडकाळ जमिनीवर ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आहे. अवघ्या वर्षभरातच या तरुणांनी लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या बागेवर फळे लगडली आहेत. या तिघांना प्रत्येकी पाच लाख उत्पन्नाची अपेक्षा ड्रॅगन फ्रुट च्या शेतीमधून आहे. जाफराबाद तालुक्यातील हातडी या गावच्या तीन तरुणांनी हा आगळावेगळा प्रयोग कसा केला हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
सोपान भोरे, गणेश भोरे आणि नारायण जगदाळे अशी या तीनही तरुणांची नावे आहेत. ते जाफराबाद तालुक्यातील हातडी या गावातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे सीताफळाची बाग होती. बागेतील सीताफळे विकण्यासाठी ते जेव्हा जालना बाजार समितीत गेले, तेव्हा त्यांना ड्रॅगन फ्रुटची बोली म्हणजेच लिलाव ऐकायला आला. उत्सुकता म्हणून त्यांनी तो पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा ड्रॅगन फ्रुट या फळाला तब्बल 200 रुपये प्रति किलो एवढा विक्रमी दर मिळत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं.
तिथेच त्यांनी ड्रॅगन फ्रुट घेऊन आलेल्या शेतकऱ्याचा नंबर घेतला आणि थेट त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बागेची पाहणी केली. हा प्रयोग आपण आपल्या शेतामध्येही करू शकतो, असा विश्वास त्या तिघांनाही वाटला. आणखी काही ठिकाणी ड्रॅगन फूडच्या बगीचांना भेटी देऊन त्यांनी यातील बारकावे समजावून घेतले. यानंतर सांगोला येथे जाऊन ड्रॅगन फ्रुटच्या रूपांची खरेदी केली.
2023 मध्ये या रोपांची त्यांनी ट्रॅली पद्धतीने लागवड केली. यामध्ये रोपांची संख्या दुपटीने वाढते. एक एकरमध्ये तब्बल 4000 रोपांची दहा बाय दोन फुटावर लागवड करण्यात आली. 12 महिन्यानंतर या ड्रॅगन फ्रुटच्या बागेवर फळे लगडल्यास सुरुवात झाली आहे. हे या हंगामात 4 ते 5 टन ड्रॅगन फ्रुट प्रति एकर होईल, असा विश्वास या तिघांनाही आहे. प्रति किलो 100 रुपये दर जरी मिळाला तरी या तरुणांना एकरी 4 ते 5 लाखांचं उत्पन्न होणार आहे.
ड्रॅगन फ्रुट काय आहे हे आम्हाला माहीत नव्हते. जालना मार्केटमध्ये आल्यानंतर लिलाव सुरू असताना आमचं तिकडे लक्ष गेलं आणि तिथूनच ड्रॅगन फूट लावण्याचा निर्णय झाला. सध्या बागेची परिस्थिती चांगली असून हंगाम संपेपर्यंत 4 ते 5 टन मालाची अपेक्षा आहे. त्या फळांच्या विक्रीतून एकरी 5 लाख उत्पन्न होईल, अशी अपेक्षा असल्याचं सोपान भोर या तरुणाने सांगितलं.