मांडवा हे जालना शहरापासून 18 ते 20 किमी अंतरावर बदनापूर तालुक्यातील गाव आहे. मुख्य गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर 400 ते 500 लोकसंख्या असलेली गायरानवाडी नावाची वस्ती आहे. या गावात आजही सिंगल फेज 24 तास असणारी वीज पोहोचलेली नाही. विद्युत पंपांसाठी दिली जाणारी केवळ 8 तासांची वीज या गावात याआधी उपलब्ध होती.
advertisement
परंतु मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळाने गावातील एक खांब कोसळला. दोन महिने उलटले तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाग आली नाही. त्यामुळे मे महिन्यापासून या गावातील नागरिक अंधारात जीवन व्यतीत करण्यास मजबूर आहेत. या गावात फक्त विजेचाच प्रश्न नाही. गावापासून दोन किमी अंतरावर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यापर्यंत जाण्याला पक्का म्हणावा असा रस्ता नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या लेकीबाळींना रुग्णालयात नेण्यासाठी दीड ते दोन किमी बैलगाडीत टाकून न्यावे लागते.
देश एकीकडे आर्थिक प्रगती करत असताना या गावांमध्ये मात्र रस्ता, वीज यासारख्या मूलभूत सुविधा देखील नाहीत. पावसाळा सुरू झाल्याने डेंगू, मलेरिया सारखे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गावात डासांचे प्रमाण प्रचंड आहे. गावातील सर्व नागरिक घराच्या बाहेर असलेल्या अंगणात झोपतात. पंख्यासारखी इलेक्ट्रिक उपकरणे वीजच नसल्याने निरुपयोगी झाली आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आम्हाला वीज आणि रस्ता या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.