कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा गुरुवार, 29 मे रोजी दुपारी 12 वाजता तलासरी येथील माकपच्या कार्यालयातून निघणार आहे. यावेळी हजारो आदिवासी बांधवांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते आणि कार्यकर्ते, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते आणि इतर अनेक नेते यावेळी सहभागी होणार आहेत.
लहानू कोम यांचा सामाजिक-राजकीय प्रवास...
लहानू कोम यांनी 1959 पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सक्रिय सहभाग घेतला. वारली आदिवासी उठावाच्या नेत्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर यांच्या नेतृत्वात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. आदिवासींना सावकारांच्या गुलामीच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आदिवासींच्या जमिनीच्या हक्कासाठी आणि त्यांच्या इतर प्रश्नांसाठी लहानू कोम यांनी संघर्ष केला. आदिवासी भागात माकपचा जनाधार वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आदिवासींच्या हक्कासाठी झटताना त्यांनी त्यांच्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा घेऊन जाण्यासाठी अथक प्रयत्न केले.
advertisement
1977 मध्ये डहाणू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1990 मध्ये जव्हार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. सलग तीन टर्म त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. पक्षाच्या नियमामुळे त्यांना पुढील टर्ममध्ये उमेदवारी मिळाली नाही. मात्र, आदिवासी-शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सक्रिय होते. लहानू कोम यांनी आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी 1962 मध्ये स्थापन झालेल्या 'आदिवासी प्रगती मंडळ' या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. अखेरपर्यंत ते या संस्थेत कार्यरत होते. या संस्थेच्या माध्यमातून लाखो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. पालघरच्या विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरीसारख्या दुर्गम भागात त्यांनी अनेक विकासाची कामे केली. समाजकार्यातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.