2008 मध्ये मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला. 17 वर्षानंतर या प्रकरणातील सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे साध्वी प्रज्ञा सिंह आणि इतरांचे फोटो झळकावत आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली.
advertisement
भर रस्त्यावर सेलिब्रेशन सुरू होते. याच वेळी काही जणांनी रस्त्यावर फटाके फोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटकाव केला. पोलिसांच्या हस्तक्षेपाने हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले. काही वेळ पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची, हुज्जत सुरू होती. आपण फटाके फोडूनच सेलिब्रेशन करणार असल्याच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते ठाम होते. अखेर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर हिंदु्त्ववादी कार्यकर्त्यांनी माघार घेतली.
आरोपींची निर्दोष सुटका...
मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा निकाल आज एनआयए विशेष कोर्टाने सुनावला आहे. मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. विशेष कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सगळ्या आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले आहे. एनआयएने खटल्याच्या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले होते.
या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी होते.