पुणे : गणेशोत्सव म्हटलं की, डोळ्यासमोर येतं बाप्पाचं साजिरं रूप, आरती, उकडीचे गरमागरम मोदक, सुंदर मखर, नातेवाईक-मित्रमंडळींच्या भेटीगाठी, ढोल-ताशाचा निनाद, इत्यादी, इत्यादी. शिवाय गणेशोत्सव एका गाण्याशिवाय जणू अपूर्णच असतो. या उत्सवात 'बाप्पा मोरया रे...' हे गीत वर्षानुवर्षे वाजतंय. जे कधीच जुनं वाटत नाही आणि ऐकायला कंटाळाही येत नाही.
अनेक दशकं रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं हे गाणं लोककवी स्व. हरेंद्र जाधव यांनी लिहिलं असून त्याची संगीतरचना मधुकर पाठक यांची आहे. तर, गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला काही तोडच नाही. आपण व्यवस्थित ऐकलं असेल तर या गाण्यात 1972 साली आलेल्या भयंकर दुष्काळाचं वर्णनही केलेलं आहे.
advertisement
दुष्काळात लोकांना खायला भात नव्हता. त्यावेळी सरकारनं अमेरिकेहून लाल गहू आयात केले होते. तेव्हा महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेच्या वेदना, व्यथा अगदी ठामपणे या गाण्यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. साहित्य अभ्यासक सोमनाथ कदम यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रात सलग 3 वर्षे दुष्काळ होता. त्यावेळी गणेशोत्सवात उकडीचे मोदक बनवायलाही लोकांकडे तांदूळ नव्हते. मग अनेकजणांनी लाल गव्हाच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला. याचंच वर्णन बाप्पा मोरया रे गाण्यात आहे. 'नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे? सेवा जाणून, गोड मानून द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा', या ओळींमधून 1971 सालच्या दुष्काळाच्या भीषण परिस्थितीचं वर्णन करण्यात आलंय. आज अनेक दशकं लोटली असली तरी आपण हे गाणं आवडीनं ऐकतो. सर्व वयोगटातील व्यक्तींना ते भावणारं आहे.