मुळचे पुण्याचे असलेले सुशील नेमाडे आणि प्रियंका नेमाडे या दाम्पत्याने आयर्लंडमधील डब्लिन शहरात गणरायाची स्थापना केली आहे. सुशील आणि प्रियंका सध्या डब्लिन शहरात वास्तव्याला आहेत. सुशील नेमाडे हे 'मास्टर कार्ड' या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करतात. नेमाडे दाम्पत्य दरवर्षी डब्लिन येथील घरी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतात. त्यांना पुण्यात लहानपणापासून गणेशोत्सवाचे संस्कार लाभले आहेत. आयर्लंडमध्येही तितक्याच श्रद्धेने आणि प्रेमाने हे संस्कार जपले आहेत. डब्लिनमध्ये ते संपूर्ण 10 दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.
advertisement
या वर्षी पदेशातील घरी प्राणप्रतिष्ठ करण्यासाठी त्यांनी पुण्याहून आकर्षक गणपती बाप्पाची मूर्ती मागवली आहे. बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर दररोज पूजा, आरती, नैवेद्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची त्यांच्या घरी रेलचेल असते. नेमाडे दाम्पत्याच्या गणेशोत्सवात भारतातील मित्र-मैत्रिणी आणि स्थानिक नागरिक देखील सहभागी होतात.
सुशील नेमाडे म्हणाले, "परदेशात असलो तरी पुण्याशी असलेली नाळ तुटलेली नाही. आम्ही जेव्हा पुण्याहून दूर आलो तेव्हाच ठरवलं की, आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रसार करायचा. गणेशोत्सव हा आमच्यासाठी केवळ सण नाही तर ओळख आहे."