सातारा : सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक जवान या जिल्ह्यानं आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी दिले आहेत. त्यात अनेक जवानांना वीरमरणही आलं. याच जवानांच्या वीरपत्नींना सातारा जिल्ह्यातील प्रशासनाकडून खटाव तालुक्याच्या धोंडेवाडीत 30 एकर जागा देण्यात आली आहे. आता या खडकाळ माळरानाला हिरवा शालू नेसवण्याचा विडा सातारच्या 6 वीरपत्नींनी उचलला आहे.
advertisement
30 एकर खडकाळ डोंगर भागातील जमिनीवर नंदनवन फुलवण्यासाठी वीर नारी फ्रुट प्रोडक्शन कंपनीची स्थापना वीरपत्नींनी केली आहे. ही कंपनी भारतातील पहिली फ्रुट प्रोड्युसर कंपनी ठरलीये. त्यासाठी इंडियन आर्मीच्या बॉम्बे इंजीनिअरिंग रेजिमेंट, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा, आर्मी वॉर विंडोज असोसिएशन नवी दिल्लीसह वीरपत्नींना अनेक मदतीचे हात मिळाले.
हेही वाचा : पूजेच्या साहित्याचा व्यवसाय, महिलांना घरबसल्या रोजगार; कमाई हजारोंची!
दुष्काळ हा जणू खटाव तालुक्याच्या पाचवीला पुजलेला. या दुष्काळावर मात करण्यासाठीच वीरपत्नींनी इथं वृक्ष लागवड आणि फळ लागवड करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये 3 हेक्टर जागेत केशरी आंबा, 2 हेक्टर जागेत पेरू, 2 हेक्टर जागेत सीताफळ आणि उर्वरित क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जाणार आहे. धोंडेवाडीत व्यवसाय केंद्राची स्थापनादेखील त्या करणार आहेत. पॅकिंग हाऊस, क्लिनिंग अँड ग्रेडिंग युनिट, कोल्ड स्टोरेज आणि ट्रेड सेंटरची उभारणी इथं केली जाणार आहे. फ्रुट प्रोड्युसर कंपनीत सर्व महिलाच सहभागी असतील. केवळ महिलांची असलेली ही कंपनी सातारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील पहिली कंपनी ठरतेय. यात सध्या 290 महिला सभासद आहेत.
वीरपत्नी सत्वशीला शिवाजी सावंत, वीरपत्नी विमल काशिनाथ कदम, वीरपत्नी नर्मदा जनार्दन कदम, वीरपत्नी सुनिता अशोक सावंत, वीरपत्नी वाहिदा जाकीर हुसेन पठाण, वीरपत्नी इमताज मुनीर खान यांना धोंडेवाडीतील जमीन मिळाली आहे. इथं सैन्य दलाकडून मेहनत घेऊन एकूण 2 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले 3 शेततळे तयार करण्यात आले. 550 खड्डे वृक्ष लागवडीसाठी काढण्यात आले. तसंच 50 खड्ड्यांमध्ये फळझाडांची लागवड केली आहे. भारतीय सैन्य दलाकडून 70 दिवसांच्या कार्यकाळात तब्बल 50 लाखांची कामं करण्यात आली आहेत. या वृक्ष लागवडीची सुरूवात सैन्य दलाचे लेफ्टनंट कर्नल प्रवीण त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली.
हेही वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण: 'आधी विचार संसाराचा', योजनेबाबत महिला म्हणतात...
महत्त्वाचं म्हणजे दुष्काळी भागातील जमिनीवर वीरपत्नींनी वृक्ष लागवड केल्यामुळे साताऱ्यासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांच्या या कार्याला भारतीय जवानांनी मोठं सहकार्य केलं. तब्बल 70 दिवस उन्हात घाम गाळून 2 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले 3 शेततळे या जवानांच्या माध्यमातून उभे राहीले जे अत्यंत कौतुकास्पद आहे. हे कार्य प्रचंड प्रेरणादायी असून यातून सर्वांनाच प्रेरणा मिळेल, असं मेजर आनंद पाथरकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी म्हटलं.





