सातारा : मुंबईला खिडकीत पाहायला मिळतात तेवढीच झाडं, नाहीतर दाट झाडी पाहायची असेल तर एखाद्या उद्यानात जावं लागतं. म्हणूनच गाव हवंहवंसं वाटतं. कारण तिथे जिकडेतिडके सुंदर गर्द हिरवी झाडी असते. मात्र आता गावाकडेही झाडांची संख्या कमी होऊ लागलीये. अनेक माळरानं ओसाड दिसू लागली आहेत. सातारकरांनी यावर उपाय म्हणून एक अनोखा उपक्रम राबवला आहे.
advertisement
शाळेत आपण 'झाडे लावा, झाडे जगवा' हे घोषवाक्य शिकलो होतो. जे पळायचोसुद्धा, एक का होईना पण हौशीने रोपलागवड करायचो. परंतु नंतर मात्र आपण आपल्या आयुष्यात एवढे व्यस्त झालो की, पर्यावरणासाठी काहीतरी करायला हवं याचा आपल्याला विसरच पडला. म्हणूनच गावं पुन्हा हिरवीगार व्हावी यासाठी सातारा पंचायत समितीने 'झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा' हा उपक्रम राबवायचं ठरवलं. पर्यावरण रक्षण होईल आणि रोजगारही मिळेल, हा यामागचा उद्देश. या उपक्रमात 40 गावांना सहभागी होता येईल. आतापर्यंत 35 गावांनी या योजनेत भाग घेतला आहे. हा उपक्रम नेमका आहे तरी काय, याबाबत माहिती दिली आहे सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी.
हेही वाचा : ना पार्टी, ना पिकनिक; तरुणीनं निसर्गात साजरा केला बर्थडे, लावली हजार झाडं!
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचं काम सुरू आहे. साताऱ्यात झाडांचं प्रमाण वाढावं यासाठी झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत गावांना 250 झाडं दिली जातील. विविध प्रजातींच्या या झाडांमधून उमेद बचत गटांतर्गत 4 महिलांना रोजगार मिळेल. त्यानुसार दरमहा झाडांच्या देखभालीसाठी किमान 9 हजार रुपये एका बचत गटाला दिले जातील. झाडांचं संगोपन करणं, त्यांना पाणी देणं, गवत काढणं, इत्यादी कामं दररोज करणं आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत प्रतिदिन एका महिलेला 297 रुपये मजुरी दिली जाईल. 1 महिला आठवडाभर काम करेल. त्यानुसार त्या आठवड्याचे पैसे 15 दिवसांच्या आत खात्यात येतील. आतापर्यंत 6 गावांमध्ये 500हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली असून 156 महिलांना रोजगार देण्यात आला आहे. या रोजगाराच्या माध्यमातून 2079 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. सातारा तालुक्यात आतापर्यंत एकूण 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने वृक्षारोपण करण्यात आलं आहे.
हेही वाचा : घरात एकतरी रोप असावं, ते नेमकं कोणतं? स्वतः डॉक्टरांनी सांगितलं
झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा या योजनेमुळे नरेगाच्या माध्यमातून जॉब कार्ड असलेल्या महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होणार असून प्रतिदिन 297 रुपये मानधन मिळेल. वृक्ष लागवड आणि जतन हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण भागातील अनेक झाडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आंबा, फणस, जांभूळ, वड, पिंपळ, इत्यादी अनेक प्रकारची झाडं या उपक्रमांतर्गत लावण्यात येणार आहेत. गावकऱ्यांसह सर्वांनाच या झाडांचा उपयोग होईल. सर्वांना शुद्ध हवा मिळावी, गाव हिरवंगार व्हावं, यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितलं.