ना पार्टी, ना पिकनिक; तरुणीनं निसर्गात साजरा केला बर्थडे, लावली हजार झाडं!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च कमी करून तरुणांनीही आपल्या वाढदिवशी एकतरी झाड लावण्याचा संकल्प करावा, असं आवाहन तिनं केलं.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला खास दिवस असतो. या दिवशी काहीतरी विशेष करण्याचा मानस जवळपास प्रत्येकाचा असतो. काहीजण कुटुंबियांसोबत, तर काहीजण मित्रमंडळींसोबत वाढदिवस साजरा करणं पसंत करतात. काहीजणांना मात्र वाढदिवसानिमित्त समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. याच इच्छेतून एका तरुणीनं आपल्या वाढदिवशी तब्बल 1000 झाडांची लागवड केली. तिनं येणाऱ्या अनेक पिढ्यांना शुद्ध हवा मिळावी, ताजी फळं खाता यावी, एवढा व्यापक विचार केला. या कार्यामुळे तिचं कौतुक होतंय.
advertisement
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात वसलेल्या हातडी या छोट्याशा गावच्या रहिवासी प्राजक्ता काळे. यांनी आपल्या वाढदिवशी गावात तब्बल 1000 झाडं लावण्याचा उपक्रम पार पाडला. त्यांनी नुकतंच फिजिओथेरपीचं शिक्षण पूर्ण केलंय. लहानपणी गावी आल्यावर शेताच्या बांधावर, परिसरात त्यांना मोठमोठी झाडं दिसायची. आता मात्र गाव अगदी सुनसान वाटतं. इथल्या झाडांची संख्या प्रचंड कमी झालीये. हीच खंत दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः गावात पुन्हा एकदा हिरवळ फुलवण्याचा उपक्रम हाती घेतला आणि गावकऱ्यांनी त्यांना यात साथ दिली.
advertisement
सुरूवातीला प्राजक्ता यांनी ही वृक्षारोपणाची कल्पना आपल्या वडिलांसमोर आणि गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींसमोर मांडली. गावकऱ्यांनी या संकल्पनेला आनंदानं प्रोत्साहन दिलं. त्यानंतर वड, पिंपळ, आवळा, यांसारख्या पारंपरिक वृक्षांची रोपं खरेदी करण्यात आली. गावकरी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रामुख्यानं महिलांनी त्यांना वृक्षारोपणात मदत केली. त्याचबरोबर गावकऱ्यांनी ही झाडं जगवण्याचा संकल्प केलाय. महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ता यांनी यावेळी अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांना हार्टफुल रिलॅक्सेशन एक्सरसाइजच्या काही स्टेपदेखील शिकवल्या.
advertisement
'पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. जागतिक तापमानवाढीमुळे आपल्याला अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च कमी करून तरुणांनीही आपल्या वाढदिवशी एकतरी झाड लावण्याचा संकल्प करावा', असं आवाहन प्राजक्ता काळे यांनी तरुणमंडळींना केलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 21, 2024 3:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
ना पार्टी, ना पिकनिक; तरुणीनं निसर्गात साजरा केला बर्थडे, लावली हजार झाडं!