सोलापूर : वाहनांची वर्दळ वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी, दुपारी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सोलापूर शहरातील सिग्नलची वेळ आता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सलग ठेवण्यात आली आहे. शहरात सध्या 12 प्रमुख चौकातील सिग्नल सुरू आहेत. यापूर्वी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येत होते. या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर अशोक खिरडकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
सोलापूर आरटीओकडील नोंदणीनुसार सोलापुरात 18 हजार पेक्षा अधिक रिक्षा तर 10 लाखांवर दुचाकी आहेत. शहरात पार्किंगची समस्या असल्याने अनेक रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे थांबलेली दिसतात. सोलापूर शहराच्या हद्दीत दरवर्षी पाचशेहून अधिक अपघातात सरासरी 80 जणांचा मृत्यू होतो. अनेक वाहन धारकांकडून वाहनाच्या वेगाची मर्यादा पाळली जात नाही.
त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी, अशा समस्या जाणवतात. त्यावर उपाय म्हणून सोलापूर शहरातील मुख्य चौकांमधील सिग्नल सलग 12 तास म्हणजेच सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेवले जाणार आहे. तसेच त्याठिकाणी वाहतूक अंमलदार दोन सत्रात नेमले आहे. त्यामुळे त्यांची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.
सोलापूर शहारातील'या चौकातील सिग्नल सुरू
सोलापूर शहरात सध्या महावीर चौक, पत्रकार भवन, आसरा चौक, गांधी नगर, डफरीन चौक, संत तुकाराम चौक, सरस्वती चौक, सिव्हिल चौक, आम्रपाली चौक, शांती चौक, बोरामणी नाका चौक, महालक्ष्मी मंदिर या 12 चौकांमधील सिग्नल सुरू आहेत. गुरुनानक चौक, महिला हॉस्पिटल, रंगभवन चौक, वोडाफोन गॅलरी, भैय्या चौक, सत्तर फूट चौक, मार्केट यार्ड चौक व व्हिको प्रोसेस या चौकांमध्ये देखील सिग्नल आहेत.