सोलापूर : आजकाल जवळपास सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात. असे फार कमी पालक पाहायला मिळतात ज्यांना वाटतं की, आपल्या मुलांनी मातृभाषेत शिकावं, मराठी माध्यमाच्या शाळा सुरू राहाव्या, त्यामुळे ते आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवतात. परंतु बहुतांशी अव्वाच्या सव्वा फी भरावी लागत असली तरी खासगी शाळांमध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं जातं, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगलं शिकवत नाहीत ही ओरड वर्षानुवर्षे ऐकू येते. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट आता अगदीच खालावल्याचं पाहायला मिळतं. परंतु याच शाळांमधून शिकून अनेक डॉक्टर, वकील, कलेक्टर पुढे येतात हेही खरंय. त्यामुळे याबाबतीत सोलापूरकरांना खरोखर मानलं पाहिजे.
advertisement
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेबाहेर चक्क प्रवेश बंदचा बोर्ड लावण्यात आलाय. जिल्ह्यातील गुणवत्तेत आणि पटसंख्येत अग्रेसर अशी ही शाळा आहे. त्यामुळे पालक भविष्याबाबत खूप स्वप्न उराशी बाळगून आपल्या मुलांचा प्रवेश याच शाळेत करतात. गेल्यावर्षी या शाळेची पटसंख्या होती 743 आणि आता 200 हून अधिक विद्यार्थी या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रतीक्षेत आहेत.
हेही वाचा : मुलांच्या पोटात जंत झालेत हे कसं ओळखावं? स्पष्ट जाणवतात लक्षणं
सरकारी शाळा म्हणजे बसायला चांगले बाक नसतील, विद्यार्थ्यांचे हाल होत असतील, असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु या सगळ्याला छेद देणारी ही शाळा आहे. इथं विद्यार्थ्यांसाठी चक्क डिजिटल क्लासरूम आहेत. बरं ही प्रगती आजची नाहीये, तर या शाळेला 15 वर्षांपूर्वीच ISO मानांकन प्राप्त झालंय. तसंच शाळेला आतापर्यंत 13 पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. त्यामुळे इथं केवळ पापरीतील मुलं शिकत नाहीत, तर आजूबाजूच्या 5 ते 6 गावांमधील विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. विशेष म्हणजे या शाळेत 25 शिक्षक पुरस्कारप्राप्त आहेत आणि 260 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे. पापरी येथील ही जिल्हा परिषदेची शाळा 10 वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणामुळे लोकप्रिय आहे.
विशेष म्हणजे शाळा आपल्या शैक्षणिक पद्धतीत गावकऱ्यांनाही सामावून घेते. शाळेत कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर त्याबाबत सर्वात आधी गावातील लोकांना माहिती दिली जाते. गावकऱ्यांशी विचार-विनिमय करूनच शाळेकडून त्या उपक्रमाची अंमलबजावणी होते. सध्या या शाळेत आणखी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे प्रवेश बंद असा फलक शाळेबाहेर लावण्यात आला आहे. इयत्ता पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंत या शाळेत विद्यार्थी शिकतात. सध्या प्रवेशासाठी 200 ते 300 विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ यांनी याबाबत माहिती दिली.