सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा पैकीच्या पैकी गुण मिळवत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. परंतु, काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांनी देखील लक्ष वेधलंय. सोलापुरातील अशाच 35 टक्के गुण मिळवलेल्या दोघा विद्यार्थ्यांची सर्वत्र चर्चा आहे. शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख अशी त्यांची नावे आहेत. लोकल18 च्या माध्यमातून त्यांचाच प्रवास जाणून घेऊ.
advertisement
शिवम काठावर पास
सोलापूरच्या भवानी पेठ येथील शिवम सचिन वाघमारे याला दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत 35 मार्क मिळाले असून तो काठावर पास झाला आहे. या यशानंतर शिवमच्या कुटुंबीयांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत मोठा जल्लोष केला. शिवम हा सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी असून त्याचे वडील जागा खरेदी-विक्रीचे काम करतात.
“शिवमचे हे यश अनपेक्षित आहे. आम्हाला तो पास होईल याची खात्री नव्हती. पण सगळ्या विषयात 35 टक्के मिळवत तो पास झाला आहे. याचा आम्हाला आनंद आहे,” असे वडील सचिन वाघमारे म्हणाले.
कॉन्फिडन्स जोरात
शिवमला 500 पैकी 175 गुण मिळाले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल सायन्स या सर्व विषयात त्याने 35 गुण मिळवले आहे. दहावीत काठावर पास झाला असला तरी शिवमचा आत्मविश्वास जोरात आहे. “मला आयटीआय करायचा असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढील शिक्षणात चांगला अभ्यास करून जास्त मार्क पाडणार आहे. आता मी आनंदी असून या यशाचं श्रेय आई-वडिलांचं आहे,” असं शुभम सांगतो.
शुभमला 35 टक्के गुण मिळाल्याची माहिती मिळताच गल्लीतील मित्र गोळा झाले. आई-वडिला, आजी, बहीण यांच्यासह मित्रांनी एकत्र येत गुलालाची उधळण केली. तसेच फुलांचा हार घालून जल्लोष केला.
इम्रानला 35 टक्के गुण
सोलापूर येथील स्वामी विवेकानंद नगर हतुरे वस्ती येथे राहणारा शेख इमरान अब्दुल्ला या पठ्ठ्याने देखील सर्वच विषयांत 35 गुण मिळवले आहेत. इम्रान देखील 35 टक्के गुण घेऊन दहावीच्या परीक्षेत काठावर पास झाला आहे. इम्रानने अकरावी सायन्समधून शिक्षण घेण्याचा विचार असल्याचे सांगितले.
दरम्यान, सोलापुरातील शुभम आणि इम्रान यांच्या या अनोख्या कामगिरीची सर्वत्र चर्चा आहे. सर्व विषयांत 35 टक्के गुण मिळवणारे इतरही काह विद्यार्थी आहेत.