पावसामुळे नदी धोक्याच्या पातळीजवळ
सलग मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नद्यांचा पाणलोट प्रचंड वाढला आहे. उल्हासनदी आणि काळू नदीने इशारा पातळी गाठण्याच्या जवळपास पोहोचल्या असून बदलापूर, उल्हासनगर, मोहने आणि टिटवाळा भागांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, बारवी आणि तानसा धरणं ओव्हरफ्लो झाली असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बारवी धरणातून 28.39 घनमीटर प्रती सेकंद तर तानसा धरणातून तब्बल 313 घनमीटर प्रती सेकंद पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने इशारा दिला असून नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
ठाणे जिल्ह्यात पावसाने घेतले 20 बळी...
ठाणे जिल्ह्यातील पावसाने यंदा आतापर्यंत 20 जणांचा बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरबाड तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस कल्याण तालुक्यात इतका नोंदवला गेला आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मुंब्रा परिसरात रस्त्यावरून नदीसारखे पाणी!
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा परिसर जलमय झाला आहे. पावसाने दमदार बॅटिंग करताच रस्त्यांवरून अक्षरशः नदीसारखे पाणी वाहताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
मुंब्रा बायपाससह अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वाहनधारकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, परिसरातील अनेक दुकानांतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल....
ठाणे घोडबंदर वाहिनीवर सध्या चालू असलेल्या पावसामुळे पाटलीपाडा, मानपाडा ब्रिज खाली, चितळसर पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्या कारणाने वाहतूक संथ असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तसेच मीरा-भाईंदर हद्दीमध्ये वर्सोवा, काजू पाडा व चेना गाव या ठिकाणी कमरे एवढे पाणी साचल्याकारणाने तेथील वाहतूक बंद आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वरून मीरा-भाईंदर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. कोणीही या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
घोडबंदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घोडबंदर मार्गावरून प्रवास करीत असताना पर्यायी मार्गाचा-ठाणे होऊन घोडबंदर कडे जाताना पोखरण रोड नंबर दोन मार्ग, ग्लॅडियस अवरनेस रोड, मुल्लाबाग या मार्गाचा वापर करावा तसेच घोडबंदरहून ठाणे कडे जाताना आनंदनगर, वाघबीळ, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड कोलशेत या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.