यवतमाळ: शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून ओळखलं जातं. यवतमाळमधील दोघी शेतकरी महिला जीवनदात्याही झाल्या आहेत. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना 'ब्रेन डेड' घोषीत केलं. मात्र, त्यांच्यामुळे इतर चौघांना नवजीवन मिळालं आहे. कळंब तालुक्यातील मुसळी येथील 30 वर्षीय मनीषा कोकांडे आणि वणी तालुक्यातील सेलूच्या 43 वर्षीय सुधा गुहे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयामुळे मृत्यूनंतरही मनीषा आणि सुधा या अयवरुपानं जिवंत राहणार आहेत.
advertisement
30 वर्षीय मनीषाचा अपघात
गत आठवड्यात कळंब तालुक्यातील मुसळी या गावातील रहिवासी मनीषा कोकांडे (वय 30 वर्षे) यांना अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. शेतातील कामे आटोपून कळंब येथून दुचाकीने घरी परतताना रस्त्यात गाडी उसळली आणि त्या खाली पडल्या. त्यांना प्रथम यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले व तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुटुंबीयांना अवयवदानासाठी विनंती
रुग्णालयात भरती केल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु डोक्यातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती न्यूरोलॉजीकलदृष्ट्या खालावत गेली. तज्ज्ञांच्या चमूने तपासणी केली असता त्यांचा मेंदू पूर्णपणे मृत झाल्याचे निदान झाले. वर्षभरापूर्वीच मनीषाच्या पतीचे निधन झाले असताना पाच आणि तीन वर्षांच्या तिच्या दोन मुलांवर पुन्हा काळाने घाला घातला. तिच्या जिवंत राहण्याच्या आशाच मावळल्याने अखेर रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे व डॉ. रूपाली नाईक यांनी समुपदेशन करीत मनीषाच्या वृध्द मातापित्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत अवयवदान करण्यास विनंती केली.
आई-वडिलांची अवयवदानास संमती
मनीषाची आई मंदा व वडील रमेश पेंदारे यांनी सामाजिक भान जोपासत अवयवदानासाठी संमती दिली. झेडटीसीसी अर्थात क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने नंतरची कार्यवाही करण्यात आली. मनीषाच्या अवयवदानातून प्राप्त झालेल्या एका किडनीचे सावंगी रुग्णालयातच उपचार घेणाऱ्या 49 वर्षीय गरजू स्त्रीरुग्णावर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले. तर दुसरी किडनी नागपुरातील अन्य रुग्णालयात भरती असलेल्या 23 वर्षीय तरुणीवर प्रत्यारोपित करण्यात आली.
उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास होतोय? ही चूक अजिबात करू नका! Video
पुन्हा अवयवदान
या अवयवदानाला आठ दिवसांचा कालावधी लोटत नाही तर पुन्हा एकदा अवयवदानासाठी सावंगी रुग्णालयाला पुढाकार घ्यावा लागला. वणी तालुक्यातील सेलू (शिरपूर) येथील शेतमजुरी करणाऱ्या सुधा गुहे (43 वर्षे) यांना गत ब्रेन हॅमरेजमुळे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. न्यूरो विभागाद्वारे तातडीने तपासण्या करण्यात आल्या असता मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले.
असं मिळालं जीवनदान
वैद्यकीय उपचार सुरू असताना रुग्णाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रविवारी डॉक्टरांच्या चमूने रुग्णाच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे घोषित केले. रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन समुपदेशकांनी पती संजय, मुली नेहा व मानसी यांना त्याबाबत कल्पना दिली. त्यांनी आप्तस्वकीयांशी विचारविनिमय करीत हृदय, यकृत (लिव्हर), मूत्रपिंडे (किडनी) व फुफ्फुसे हे अवयव दान करीत असल्याची लेखी सहमती दिली. गुहे कुटुंबाने घेतलेल्या पुढाकारामुळे सुधा यांच्या अवयवदानातून एक किडनी नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमधील 38 वर्षीय महिला रुग्णाला प्राप्त झाली तर याच रुग्णालयातील 41 वर्षीय पुरुष रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आले.
क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. अवयव प्रत्यारोपणात शल्यचिकित्सक, नेफ्रोलॉजिस्ट, बधिरीकरणतज्ज्ञ, परिचारिका यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली तर रुग्णालय व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, प्रत्यारोपण समिती, समन्वयक, प्रशासकीय अधिकारी, वाहन चालक यांच्या चमूने सर्वतोपरी सहकार्य केले. इतरांना नवजीवन देणाऱ्या अवयवदानकर्त्यांना रुग्णालयाच्यावतीने सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण करण्यात आली.