वर्धा : शरीर सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम हवाच. लहान मुलांनी तर न चूकता दररोज व्यायाम करावा, मैदानी खेळ खेळावे, तरच त्यांची शारीरिक, मानसिक वाढ व्यवस्थित होते. आज आपण लहान मुलांसाठी उपयुक्त अशी योगासनं पाहणार आहोत. 5 वर्षांवरील सर्व मुला-मुलींनी ही योगासनं करणं फायद्याचं ठरेल. वर्धा जिल्ह्यातील योग शिक्षिका ज्योती शेटे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
घरच्या जेवणापेक्षा लहान मुलांच्या खाण्यात सध्या जंक फूड मोठ्या प्रमाणात येतं. शिवाय टीव्ही आणि मोबाईलचा वापर तास-तासभर होतो. तसंच मुलं एकाजागी बसून व्हर्च्युअल खेळ खेळतात. त्यामुळे त्यांच्या शरिराची पुरेशी वाढ तर होत नाहीच, शिवाय त्यांचं शरीर कमकुवत होत असल्याचंही दिसून येतं. याचाच परिणाम त्यांच्या बुद्धिमत्तेवर होतो. परंतु काळजी करू नका, आज आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा योगासनांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ताडासन : हे आसन मुलांची उंची वाढण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हात लॉक करायचे आणि वरच्या दिशेने ताणायचे. असं करताना पायांच्या बोटांवर उभं राहण्याचा प्रयत्न करावा. या आसनामुळे हात, पाय, पाठीचा कणा, असं पूर्ण शरीर ताणलं जातं आणि शरिराची उत्तम वाढ होते. हे आसन सकाळी उठल्यावर केल्यास जास्त फायदा मिळतो.
वृक्षासन : हे आसन करताना उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेला लावायचा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून हात वरच्या दिशेला जोडायचे. हात वर व्यवस्थित ताणून उभं राहायचं. यामुळे मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते. शिवाय पूर्ण शरिराचा भार एका पायावर आल्यामुळे पाय भक्कम होतात. म्हणून दोन्ही पायांनी हे आसन करावं.
भृजंगासन : हे आसन करताना सर्वात आधी उपडी झोपावं आणि हातावर भार देऊन पोटापासून मान वर करावी. असं केल्यानं पाठीचा कणा आणि पाय ताणले जातात. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ झपाट्याने होते. शिवाय शरिरावरील चरबीही कमी होण्यास मदत मिळते. लक्षात घ्या, यामध्ये श्वास घेत मान वर करायची आणि श्वास सोडत मान खाली करायची.
कटी वक्रासन : शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हे आसन अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्यासाठी सर्वात आधी सरळ झोपून उजवा पाय काटकोन स्थितीत ठेवून हळूच डाव्या हाताला लावायचा. नंतर डावा पाय काटकोन स्थितीत उचलून उजव्या हाताला लावायचा. या आसनामुळे संपूर्ण शरीर ताणलं जातं. मुलांच्या वाढीसाठी हे आसन उत्तम आहे.
सूर्यनमस्कार : सूर्यनमस्काराच्या 12 योगासनांचा नियमितपणे सराव केल्यास मन सक्रिय आणि एकाग्र राहतं. सूर्यनमस्कार सकाळी रिकाम्या पोटी केले जातात. शिवाय मोकळ्या जागेत केल्यास शरिराला ताजी हवा मिळते.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा





