दादर येथील फुल बाजाराजवळच सकाळच्या वेळी मासे विक्री होते. सकाळच्या वेळी मासे विक्रीचा बाजार भरतो. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी मासळी बाजार भरतो. घाऊक विक्रेत्यांसोबत, सामान्य ग्राहकदेखील या ठिकाणी येत असतात. मात्र, या मासळी बाजाराला मागील काही महिन्यांपासून स्थानिकांनी विरोध केला आहे. मासे विक्रीसाठी येणारी वाहने आणि विक्रेत्यांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी म्हटले. त्याशिवाय, अस्वच्छतादेखील निर्माण होत असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला. या ठिकाणाच्या मासळी बाजाराचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आज अचानक झालेल्या आंदोलनात स्थानिकांनी रास्ता रोको केला. यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी पाठिंबा दिला.
advertisement
दररोज मच्छीमार ट्रकमध्ये मासळी आणून सकाळी 10-12 वाजेपर्यंत सेनापती बापट मार्गावर विक्री करतात. घाऊक विक्री होत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी येथे असते. टेम्पो, ट्रकमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मच्छि विक्रेत्यांना हटवण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार केली जात आहे. त्यातच आता भाजपने पाठिंबा दिल्याने या मुद्याला थेट राजकीय रंग येण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून स्थलांतर?
दादरमधील मच्छीमारांना तात्पुरते मुलुंडमधील ऐरोली टोलनाका परिसरात हलवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या तब्बल 36 मच्छीमारांना नोटीस दिली जाणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावेळी मच्छिमारांनी याला विरोध केला होता.
