पादचारी पुलाच्या अभावी जीवघेणी कसरत
दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ पूजेच्या दिवशी हजारो नागरिक पूजा करण्यासाठी खाडीकिनारी जमा झाले. गणेशोत्सव आणि नवरात्रात जसं विसर्जनासाठी नागरिक तलाव किंवा खाडीकडे जातात, तसंच छठ पूजेसाठीही भक्तांनी गर्दी केली. मात्र, ठाकुर्ली परिसरातील पादचारी पुलाच्या अभावामुळे हा प्रवास धोकादायक ठरला. अनेक नागरिक रेल्वे रूळ ओलांडत असल्याचं दृश्य दिसलं.
advertisement
रेल्वे वाहतूक विस्कळीत, पोलिसांची धावपळ
लोहमार्ग पोलिसांनी सांगितलं की, या भागात दरवर्षी अशीच गर्दी होते. त्यामुळे यंदा रेल्वेने “कॉशन ऑर्डर” दिली होती, म्हणजे ट्रेन कमी वेगात चालवण्याचे आदेश होते. तरीही काही ठिकाणी नागरिक रेल्वेमार्गावर उतरल्याने लोकल सेवा काही काळासाठी थांबवावी लागली. या घटनेमुळे प्रवाशांना उशीर सहन करावा लागला, तर पोलिसांनी मोठा ताण झेलला.
पादचारी पूल उभारण्यासाठी मागणी
या परिस्थितीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून तातडीने त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे. वाढत्या वस्तीच्या पार्श्वभूमीवर ठाकुर्ली परिसरात रेल्वे आणि महापालिकेने मिळून नागरिकांसाठी सुरक्षित सुविधा निर्माण करावी, अशी अपेक्षा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून हजारो लोक रेल्वे रूळ ओलांडतात. रेल्वेला याची माहिती असूनही योग्य उपाययोजना होत नाही. रेल्वे प्रशासन अपघाताची वाट बघत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सध्या पावसाळा असल्याने रेल्वेमार्ग ओले आणि घसरडे झालेले असतात, त्यामुळे अशा प्रकारे रूळ ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे सेवेच्या सुरळीततेसाठी पादचारी पूल उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.






