मलप्पुरम: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील सीपीएमच्या एका नेत्याच्या विजय भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. थेंनेला पंचायत वॉर्डमध्ये अत्यंत कमी फरकाने विजय मिळवलेल्या सईद अली मजीद यांच्या भाषणातील स्त्रीद्वेषी वक्तव्यांमुळे तीव्र टीका सुरू झाली आहे. मजीद यांनी हा वॉर्ड अवघ्या 47 मतांच्या फरकाने जिंकला, मात्र त्यांच्या वक्तव्यांमुळे निवडणूक निकालापेक्षा वादच अधिक चर्चेत आला आहे.
advertisement
सईद अली मजीद यांना एकूण 666 मते मिळाली, तर त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML)च्या उमेदवाराचा पराभव केला. विशेष बाब म्हणजे मजीद यांनी याआधी सीपीएमच्या स्थानिक सचिवपदाचा राजीनामा दिला होता आणि ही निवडणूक त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.
महिलांबाबतच्या वक्तव्यांवर तीव्र संताप
विजयानंतर समर्थकांना संबोधित करताना मजीद यांनी महिलांबाबत अत्यंत अपमानास्पद वक्तव्ये केली. ज्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यांनी असे म्हटले की, लग्न होऊन कुटुंबात आलेल्या महिलांना मतांसाठी परक्या लोकांसमोर आणू नये किंवा त्यांचा वापर करून त्यांना राजकीयदृष्ट्या पराभूत करण्याचा प्रयत्न करू नये. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांनी महिलांचे स्थान केवळ पतीसोबत राहणे किंवा झोपणे इतक्यापुरतेच आहे, असा अपमानास्पद उल्लेखही केला.
ही वक्तव्ये सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आणि महिला संघटना तसेच राजकीय विश्लेषकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी अशा प्रकारच्या विधानांना सार्वजनिक जीवनात कोणतेही स्थान नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
महिला लीगच्या नेत्या संदर्भात वक्तव्य
मजीद यांनी IUMLच्या महिला आघाडी असलेल्या वूमेन्स लीगच्या अध्यक्षांनी नुकताच प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओचा देखील उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, राजकारणात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने टीकेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. तसेच राजकीय चर्चांमध्ये धार्मिक व्यक्तींवरही टीका केली जाते, असे ते म्हणाले.
यापुढे बोलताना मजीद यांनी असेही विधान केले की, ज्यांच्यात टीका ऐकण्याची हिंमत नाही; त्यांनी राजकारणात येऊ नये आणि अशा लोकांनी घरी राहून गृहिणी म्हणूनच राहावे, असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर स्त्रीद्वेषी आणि महिलांप्रती अनादर करणाऱ्या मानसिकतेचे आरोप अधिक तीव्र झाले.
या संपूर्ण प्रकरणावर सीपीएमच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
