IRCTC Scam: ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लालूप्रसाद यादव आणि कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आयआरसीटीसी प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यातच आता लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी, माजी मु्ख्यमंत्री राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लालू यादव आणि कुटुंबीयांना आता खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
advertisement
लालू यादव आणि इतरांवर आयआरसीटीसी हॉटेल विकल्याचा आणि या व्यवहाराच्या बदल्यात जमीन मिळवल्याचा आरोप आहे. कोर्टाने म्हटले की, लालू प्रसाद यादव यांच्या माहितीतच या भ्रष्टाचाराचा कट रचण्यात आला. दरम्यान, कोर्टाने लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांना आरोपांबाबत विचारले असता, त्यांनी आरोपांचा इन्कार केला.
निवडणुकीच्या धामधुमीत यादवांना धक्का...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा न्यायालयाचा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. लालू यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव न्यायालयात हजर राहण्यासाठी दिल्लीत होते. त्यांच्याविरुद्ध आज इतर दोन प्रकरणांमध्येही सुनावणी होणार आहे. तथापि, त्यांना दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नाही. लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब आज दिल्लीत असून या दरम्यान, त्यांची काँग्रेस नेतृत्वासोबत जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.