भावना यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पारेवाडी हे असून, पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. त्या म्हणतात, मी पत्रकारितेमध्ये असताना अनेक मुलाखती घेतल्या. अनेकांनी विचारले की, 'तुम्ही जैन असूनही इतकं उत्तम मराठी कसं बोलता?' तेव्हा मला जाणवलं की अनेक मोठ्या लोकांना मराठी शिकायची इच्छा असली तरी शिकवणारे कोणीच नाही.
advertisement
Women Success Story: नोकरी सोडली, 2 मैत्रिणीनी बनवला फॅशन ज्वेलरी ब्रँड, महिन्याची कमाई पाहाच, Video
हीच गरज ओळखून त्यांनी 'हसत खेळत मराठी शिकूया’ या कोर्सद्वारे भाषा शिकवण्याची पद्धत विकसित केली. इथे शुद्ध व्याकरण आणि पुस्तके यावर भर न देता, दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी बोलचाल मराठी शिकवली जाते. चार वर्षांपासून सुरू असलेल्या या क्लासमध्ये सध्या 4 वर्षे ते 81 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी सहभागी आहेत.
लॉ, मेडिकल, शेती, सरकारी भाषा, बँकिंग आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील लोकदेखील या कोर्समध्ये भाग घेत आहेत. सुरुवातीला केवळ लहान मुलांसाठी सुरू केलेले हे वर्ग हळूहळू मोठ्यांसाठीही सुरू केले आहेत. कॉर्पोरेट ऑफिसमधील ग्रुप, बँक कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा विशेष कोर्सेस घेतले जातात.
भावना यांनी सुरुवातीला स्वतः डिजिटल स्वरूपात मराठी शिकवण्यासाठी बुकलेट तयार केली. कंटेंट क्रिएशनच्या अनुभवाचा त्यांनी उत्तम वापर करून, शिकवण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत विकसित केली आहे. आजवर 350 हून अधिक लोकांना त्यांनी मराठी शिकवले असून, हा प्रवास यशस्वीपणे सुरू आहे.
भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, संस्कृती, विचारसरणी आणि समाजाशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांप्रमाणेच आपली मातृभाषा मराठीही आत्मसात करणे तितकेच गरजेचे आहे, असा ठाम विश्वास भावना बाठिया संचेती व्यक्त करतात.