सध्या बाजारात गावरान अंडे 12 ते 13 रुपये प्रती नग तर इंग्लिश अंडे 7.50 ते 8 रुपये प्रती नग या दराने विक्री होत आहेत. शेकड्याच्या हिशेबाने पाहता गावरान अंड्यांचा दर 1020 रुपये आणि इंग्लिश अंड्यांचा दर 715 ते 720 रुपये इतका आहे. मागील महिन्याच्या तुलनेत दोन्ही प्रकारच्या अंड्यांना लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
Pune News: 1 जानेवारीनंतर रस्त्यावर गाडी काढण्याआधी हे वाचाच, नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
व्यापाऱ्यांच्या मते, थंडी वाढली की लोक अंडी जास्त प्रमाणात खायला सुरुवात करतात. जिमला जाणारे तरुण इतर वेळी तीन ते चार अंडी खात असले, तरी हिवाळ्यात प्रथिनांची गरज भागवण्यासाठी दररोज सहा ते आठ अंडी सेवन करतात. यामुळे शहरी भागात मागणी अधिक वाढते. दुसरीकडे, थंडीच्या दिवसांत कोंबड्यांकडून अंड्यांचे उत्पादन कमी होते. उत्पादन घट आणि मागणी वाढ या दुहेरी परिणामामुळे दर उसळी घेत आहेत.
पुणे शहरात दररोज साधारणतः एक कोटी ते सव्वा कोटी अंड्यांची गरज भासते. पिंपरी-चिंचवडसह विस्तृत उपनगर क्षेत्रात आणखी जवळपास 50 ते 70 लाख अंड्यांची मागणी असते. या आवश्यकतेसाठी प्रामुख्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून अंड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मात्र यावर्षी देशभरात मागणी वाढल्याने हैद्राबाद, विजयवाडा आणि मैसूर येथून येणारा पुरवठा घटला आहे. राज्यांतर्गत पाहता, सांगली-मिरज येथून येणाऱ्या अंड्यांची आवक कायम असली तरी ती वाढलेल्या खपापुढे अपुरी पडत आहे.
अंड्यांचे व्यापारी लहू किरीट यांनी सांगितले की, दर सध्या 710 ते 720 रुपयांच्या आसपास आहेत. थंडी अजून वाढणार असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शेकड्याचा दर 720 ते 730 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
दर वाढले असले तरी अंड्यांच्या खपात मात्र घट झालेली दिसत नाही. प्रथिनयुक्त आहार म्हणून अंड्यांची लोकप्रियता कायम असल्याने आणि थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळावी यासाठी अनेकजण दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश वाढवत आहेत. विशेषतः गावरान अंड्यांना अधिक पसंती मिळत असून त्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे.





