Pune Crime : बाणेरमधील त्या बेपत्ता ज्येष्ठाचा झाडीत मृतदेह; रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, दिल्लीतून अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलिसांनी पकडू नये म्हणून इसाराईलने 'मी यांना दवाखान्यात नेतो' अशी बतावणी केली आणि त्यांना रिक्षेत बसवून तिथून निघून गेला.
पुणे: ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना मरणाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांनी छडा लावला आहे. इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, मूळ रा. उत्तर प्रदेश) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्या क्रूर कृत्यामुळे जखमी ज्येष्ठाला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
नेमकी घटना काय?
२० जुलै रोजी बालेवाडी फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला इसाराईलच्या रिक्षाने जोरदार धडक दिली. अपघात होताच स्थानिक लोक जमा झाले. यावेळी पोलिसांनी पकडू नये म्हणून इसाराईलने 'मी यांना दवाखान्यात नेतो' अशी बतावणी केली आणि त्यांना रिक्षेत बसवून तिथून निघून गेला.
रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपीने रिक्षा खडकीतील रेंजहिल्स परिसरातील रेल्वे मार्गाजवळ नेली. तिथे असलेल्या दाट झाडीत गंभीर जखमी ज्येष्ठाला फेकून देऊन तो पसार झाला. वडील घरी न परतल्याने मुलाने बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ सापडला.
advertisement
पोलिसांचा थरारक तपास
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून पोलिसांना रिक्षाचालकाची माहिती मिळाली. आरोपी इसाराईल हा दिल्लीतील महिपालपूर भागात लपून बसल्याची माहिती मिळताच बाणेर पोलिसांचे पथक तिथे रवाना झाले. तब्बल आठ दिवस दिल्लीत तळ ठोकून पोलिसांनी त्याला शिताफीनं ताब्यात घेतलं. पुण्यातील अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
advertisement
पुणे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असून, न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे पाच महिन्यांपासून न्यायप्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 1:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : बाणेरमधील त्या बेपत्ता ज्येष्ठाचा झाडीत मृतदेह; रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, दिल्लीतून अटक


