नव्या वातानुकूलित, आरामदायी आणि आधुनिक बसमुळे प्रवास अधिक सुखकर झाला आहे. बसची संख्या वाढल्याने गर्दी नियंत्रणात आली असून फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कष्टकरी, नोकरदार, महिला, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी अतिशय स्वस्त दरात ‘अटल बससेवा’ आणि ‘पुण्यदशम’ सेवा सुरू करण्यात आली. अटल बससेवेमुळे अवघ्या पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास शक्य झाला, तर दहा रुपयांत पुण्यदशम सेवा उपलब्ध करून देण्यात आली. स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि महात्मा गांधी बस स्थानक (पुलगेट) यांसह मध्य पुण्यातील नऊ मार्गांवर पुण्यदशम बस धावत आहेत.
advertisement
PMPML च्या ताफ्यात 2 हजार बस
सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस असून त्यात 1328 सीएनजी, 490 इलेक्ट्रिक आणि 217 डिझेल बसचा समावेश आहे. डिसेंबर 2025 अखेर डिझेल बस पूर्णतः बंद करण्याचे धोरण असून त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतून होणारे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने पुण्यासाठी आणखी दोन हजार पर्यावरणपूरक बस मंजूर केल्या आहेत. यात एक हजार सीएनजी आणि एक हजार इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल.
या निर्णयांमुळे पुण्यातील प्रदूषणात घट होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना सक्षम, जलद आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या या परिवर्तनाला पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.






