बुधवारी या गाड्या रद्द
पुण्यातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस (11010), डेक्कन एक्सप्रेस (11007), इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस (12128), इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस (22106), प्रगती एक्सप्रेस (12126), डेक्कन क्वीन (12124) या सर्व गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेली वंदे भारत एक्सप्रेस (22226) देखील आज धावणार नाही. या सर्व गाड्या दररोज मुंबईसाठी धावत असल्यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत.
advertisement
मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या ट्रेन रद्द
केवळ आजच नव्हे, तर मंगळवारी देखील मुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. सततच्या पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील घाटमाथ्यावर दगड कोसळण्याचा धोका असल्याने आणि पाण्याचे प्रमाण वाढल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांचा खोळंबा, बस स्थानकावर रांगा
या निर्णयामुळे मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या कामगार, नोकरदार वर्गासह व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. अनेकजण दररोज कामानिमित्ताने मुंबईला जातात. तसेच, महत्त्वाच्या मीटिंग्ज, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. खाजगी वाहन किंवा बससेवेचा पर्याय शोधणाऱ्यांची मात्र गर्दी वाढली असून, बसस्थानकांवरही मोठी रांग लागलेली दिसत आहे.
हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट
हवामान विभागाने मुंबईसह कोकणपट्टीसाठी पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा हायअलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्यावर सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे ट्रॅक ओलसर झाले आहेत, काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे.
दरम्यान, रेल्वे सेवा ठप्प असल्याने बससेवा आणि खाजगी टॅक्सींची मागणी प्रचंड वाढली आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मात्र काही प्रमाणात वाहतूक सुरू आहे, पण पावसामुळे वेगावर बंधन आणण्यात आले आहे.