सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील या उड्डाणपुलाच्या कामाला ऑगस्ट 2025 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले होते. तर दुसरा टप्पा 15 जानेवारीपर्यंत सुरू होणार होता, मात्र काही कारणांमुळे कामाला विलंब झाला. आता हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. डबल डेकर उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
Pune Railway : पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट, लोकलचा मेगा प्लॅन, 60 नवीन गाड्या; 6 प्लॅटफॉर्म, कुठं?
वाहतूक कोंडीतून सुटका होणार
औंध–शिवाजीनगर परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा भाग पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या परिसरांपैकी एक मानला जातो. उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र बाणेर आणि पाषाण दिशेकडील उर्वरित काम अद्याप अपूर्ण असल्याने त्या परिसरात वाहतूक कोंडी कायम आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असून प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील चौकात असणाऱ्या डबल डेकर उड्डाणपुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. बाणेरकडील टप्पा जानेवारी अखेरीस तर पाषाणकडील काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ चौक व गणेशखिंड मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
कसा असेल मार्ग?
हा डबल डेकर उड्डाणपूल रस्ते वाहतूक आणि मेट्रो मार्ग यांची संयुक्त रचना म्हणून उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे. औंध आणि बाणेर दिशेने येणारे दोन लेनचे अप-रॅम्प मेट्रो मार्गासोबत असलेल्या तीन लेनच्या डबल डेकर पुलाशी जोडले जाणार आहेत.
शिवाजीनगरहून बाणेर आणि पाषाणकडे जाणारी वाहतूक तीन लेनच्या अप-रॅम्पवरून मार्गक्रमण करेल. पुढे हा मार्ग दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन लेनच्या डाउन-रॅम्पमध्ये विभागला जाणार आहे. सुमारे 1.7 किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलात औंध–शिवाजीनगर दरम्यानचा पट्टा सुमारे 1.3 किलोमीटरचा आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर ते बाणेर दरम्यानचे डांबरीकरण पूर्ण झाले असून, रॅम्पचे उर्वरित काम पूर्ण होताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.






