कोथरुडमध्ये नवीन डबलडेकर उड्डाणपूल
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि नळ स्टॉप येथे उभारलेल्या डबलडेकर उड्डाणपुलांनी वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. याठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या यशस्वी डिझाइनचा वापर कोथरुडमधील नवीन पुलासाठी केला जाणार आहे. कोथरुडमधील हा डबलडेकर पूल पूर्ण झाल्यानंतर पौड रोड आणि चांदनी चौकाजवळील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
advertisement
वाहतूक सुविधा सुलभ करण्यासाठी कोथरुड भागात मेट्रोचा विस्तार सुरू आहे. महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, या भागात पुरेशी रस्ता रुंदी असल्यामुळे भूसंपादनाची कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न येता प्रकल्प पूर्ण करता येईल. मेट्रो मार्गाचा सुमारे 700 मीटरचा भाग आधीच बांधला गेला असून, उर्वरित 1.123 किलोमीटरचे काम अजून बाकी आहे. या प्रकल्पात एलिव्हेटेड मेट्रो व्हायाडक्ट उभारला जाणार आहे आणि कोथरुड बस डेपो तसेच चांदनी चौक येथे दोन मेट्रो स्टेशन तयार होतील. या प्रकल्पामुळे पौड रोड आणि चांदनी चौकाजवळील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.






