भाविकांच्या सोयीसाठी एसटीचं विशेष नियोजन
दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. राज्याच्या विविध भागांतून लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी आळंदीत दाखल होतात. भाविकांना ये-जा करण्यास सोयीस्कर व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आळंदी परिसरात चार ठिकाणी तात्पुरती बसस्थानके उभारण्यात आली आहेत. या ठिकाणांहून प्रवाशांच्या गरजेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांनी खासगी वाहतूक टाळून एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यात्रेच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, अतिरिक्त बसेसही सोडल्या जाणार आहेत.
advertisement
katraj Traffic : कात्रज परिसरात सकाळी ऑफिस वेळेत वाढणार वाहतुकीचा ताण; बदललेले मार्ग पाहूनच निघा
सोहळ्यासाठी अशी आहे बसची व्यवस्था
आळंदीतील कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
आळंदी मुख्य बसस्थानकावरून: स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, रायगड, ठाणे, पालघर.
आळंदी–चाकण मार्गावरून: राजगुरुनगर, नारायणगाव, संगमनेर, नाशिक, मुरबाड, कल्याण, कोपरगाव, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे.
आळंदी–वडगाव घेणंद मार्गावरून: शिक्रापूर, शिरूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, नांदेड, बीड, परभणी, नागपूर, जळगाव.
डुडुळगाव चौकीवरून: आळंदी–देहू मार्गावरील फेऱ्या सुटतील.
पंढरपूरसाठी पुण्यातून 100 जादा एसटी बस
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे 5 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. या दिवशी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे. भाविकांना प्रवासात अडचण येऊ नये म्हणून पुणे विभागाकडून स्वारगेट बसस्थानकातून 100 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच, 40 प्रवाशांचा गट असल्यास त्यांच्या सोयीसाठी घरापर्यंत एसटी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.






