छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांचं खेळायचं मजा-मस्ती करायचं वय असतं. त्यांच्या एवढी एनर्जी कुणाच्यातच नसते. काही लहान मुलं आपल्या याच एनर्जीनं आणि सकारात्मकतेनं मोठमोठे पराक्रम करतात. छत्रपती संभाजीनगरच्या कनक मुंदडा हिचं या यादीत नाव घ्यावंच लागेल. तिनं आतापर्यंत 1 नाही, 2 नाही तर तब्बल 5 वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. जे काम भल्याभल्यांना जमत नाही, ते काम या चिमुरडीनं करून दाखवलंय. त्यामुळे तिच्या आई-वडिलांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय.
advertisement
कनक मुंदडा ही छत्रपती संभाजी नगर शहरातील उस्मानपुराची रहिवासी. तिचं वय आहे फक्त 4 वर्षे. त्यामुळे एवढ्याशा मुलीनं 5 वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावे करणं हाच एक मोठा विक्रम आहे.
कनक 18 महिन्यांची असताना तिनं सर्वात पहिला रेकॉर्ड केला. कलम वर्ल्ड रेकॉर्ड हा तिचा पहिला विक्रम. त्यानंतर तिनं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दुसरा विक्रम केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचा तिसरा विक्रम नोंदवण्यात आलाय, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चौथा आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचा पाचवा विक्रम नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा : शाब्बास! 8 वर्षांच्या चिमुकल्याची सुवर्ण कामगिरी; कराटेमध्ये पटकावले 20 पदक
कनकची आई सांगते की, 'लॉकडाऊनमध्ये कनक तिच्या मोठ्या भावाच्या ऑनलाइन क्लासमध्ये कनेक्ट व्हायची. ती स्वतःच्याच मनानं अभ्यास करायची. 16 महिन्यांची असताना ती ABCD लिहायला लागली. जेव्हा आमच्या हे लक्षात आलं तेव्हा आम्ही तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचं ठरवलं. कनकच्या मामांनी आम्हाला सांगितलं की, आपण तिचे रेकॉर्ड करूया. मग आम्ही यावर रिसर्च करायला सुरुवात केली. सर्वात पाहिला रेकॉर्ड कलम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केला. लहानपणापासूनच कनकची स्मरणशक्ती उत्तम आहे. ती कोणतीही गोष्ट पटकन लक्षात ठेवते. विशेष म्हणजे ती घोकंपट्टी करत नाही, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेते. कनकची आई म्हणून मला तिचा अभिमान आहे. तिला काहीच कमी पडू नये, याची आम्ही काळजी घेतो. तिनं पुढे असंच यश संपादन करावं, अशी आमची इच्छा आहे.'
तर, 'आतापर्यंत कनकने 5 रेकॉर्ड केले आहेत, त्याचं सर्व श्रेय तिच्या आई आणि मोठ्या भावाला जातं. कनकमुळे आम्हाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मी तिच्यासोबत नेहमीच असेन', असा अभिमान कनकचे वडील अमर मुंदडा यांनी व्यक्त केला. दरम्यान, कनक ही सर्व शाळकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आदर्श ठरली आहे.