साखराळे रोडवर या रिवर्स रिक्षा स्पर्धांचा थरार रंगला होता. यामध्ये जिल्ह्यातील अनेक धाडसी रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. कमीत कमी वेळामध्ये अंतर पार करण्याच्या या शर्यतीमध्ये रिक्षा चालकांचे थरारक कौशल्य पाहायला मिळाले. उलट्या दिशेने रिक्षा पळवणे अत्यंत कठीण आणि जोखीम असलेला टास्क आहे. या स्पर्धेत भाग घेणारे रिक्षाचालक अनेक दिवस उलट्या दिशेने रिक्षा पळवण्याचा सराव करत असतात. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेमध्ये विजेत्या रिक्षा चालकांना यात्रा कमिटीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
advertisement
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, या जिल्ह्यांना अलर्ट
वाळवा हे तालुक्याचे ठिकाण असून इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवतात. ग्रामदेवतांच्या यात्रेसोबतच मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री रेणुका मातेची यात्रा भरते. वाळव्याच्या माळभागामध्ये भरणाऱ्या या यात्रेला वाळवा आणि परिसरातून मोठ्या संख्येने जमत रेणुका मातेचे भक्त जल्लोष करतात. पौर्णिमे दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी माता रेणुकेस पुरण-पोळीचा नैवेद्य आणि श्रीफळ चढवली जातात.
दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आणि धार्मिक विधी संपन्न होतात. यात्रेच्या या धार्मिक अंगासोबतच वाळव्यातील यात्रा कमिटी आणि काही हौशी मंडळी लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा भरवतात. यामध्ये पूर्वीपासूनच प्राण्यांच्या स्पर्धा भरवण्याची प्रथा आहे.यामध्ये रेड्यांच्या स्पर्धा, कुत्र्यांचा स्पर्धा वाळव्यात नेहमीच भरवल्या जातात.
अलीकडे काळ बदलतोय आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या प्रेमाप्रमाणेच लोकांना वाहनांबद्दल ही मोठे आकर्षण वाटते आहे. याचसाठी वाळव्यामध्ये यंदा रिव्हर्स रिक्षेच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या रिक्षा स्पर्धेला जिल्हाभरातून अनेक रिक्षा चालक आणि रिक्षा प्रेमींचा प्रतिसाद मिळाला. सोबतच अनेक भक्त आणि वेगवेगळ्या स्पर्धांसाठी येणाऱ्या लोकांमुळे वाळव्यामध्ये तीन दिवस मोठी आर्थिक उलाढाल होते.
यात्रेच्या परंपरेसोबतच वाळव्यातील रेणुका मातेचे भक्त आजही धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बाजू जपत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये विशेष भर टाकणाऱ्या यात्रा किंवा जत्रांना अनोख्या स्पर्धांमधून नवे बळ मिळत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.





