Shravan 2025: मंगळागौरी पूजन आणि पुत्रदा एकादशीचा शुभ संयोग; घरात या पूजा उपायांनी येईल समृद्धी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: मंगळागौरीचे व्रत पार्वती देवीला समर्पित आहे. पार्वती आणि महादेव हे आदर्श दांपत्याचे प्रतीक मानले जातात. हे व्रत केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे. लग्नानंतर पहिली...
मुंबई : आज श्रावणातील मंगळागौरी पूजनाचा दिवस असून आजच पुत्रदा एकादशी देखील आली आहे. मंगळागौरी हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि सौभाग्यदायी व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करतात. तर संतती सुखाची इच्छा असणाऱ्यांसाठी किंवा संततीच्या कल्याणासाठी अनेक श्रद्धावान लोक पुत्रदा एकादशीचा उपवास करून पूजा करतात.
मंगळागौरीचे व्रत पार्वती देवीला समर्पित आहे. पार्वती आणि महादेव हे आदर्श दांपत्याचे प्रतीक मानले जातात. हे व्रत केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे. लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते.
मंगळागौरी पूजा विधी (२०२५) -
या वर्षी श्रावण महिन्यातील मंगळागौरीच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
पहिली मंगळागौर: २९ जुलै, २०२५
दुसरी मंगळागौर: ५ ऑगस्ट, २०२५
तिसरी मंगळागौर: १२ ऑगस्ट, २०२५
चौथी मंगळागौर: १९ ऑगस्ट, २०२५
पूजेसाठी लागणारे साहित्य:
मंगळागौरी (अन्नपूर्णा) आणि महादेवाची मूर्ती किंवा पिंड. चौरंग, केळीचे खांब, हळद, कुंकू, अष्टगंध आणि अक्षता. १६ प्रकारची पाने, १६ प्रकारची फुले (जाई, शेवंती, तुळस, दुर्वा, बेल इत्यादी). १६ विड्याची पाने, १६ सुपारी, १६ खारीक-बदाम. सोळा वाती आणि कणकेचे सोळा दिवे. पंचामृत, नैवेद्य.
advertisement
पूजा करण्याची पद्धत: सकाळी लवकर स्नान करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. एका पाटावर तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्णा देवीची (मंगळागौरीची) मूर्ती आणि शेजारी महादेवाची पिंड ठेवा. सर्वप्रथम गणपतीची पूजा करून, कलश आणि दिव्यांची पूजा करा. देवीला षोडशोपचार पूजा (सोळा उपचारांनी पूजा) करून १६ प्रकारची पाने आणि फुले अर्पण करा. देवीसमोर कणकेचे सोळा दिवे लावा आणि कहाणी वाचा. पुरणपोळी किंवा इतर पक्वान्नांचा नैवेद्य दाखवा. रात्री जागरण करून पारंपरिक खेळ (फुगडी, झिम्मा) आणि गाणी गाऊन आनंद साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून आणि दही-भाताचा नैवेद्य दाखवून पूजा समाप्त केली जाते.
advertisement
पुत्रदा एकादशी पूजा विधी - श्रावण महिन्यातील शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. हे व्रत विशेषतः संतती प्राप्तीसाठी केले जाते. एका पाटावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवा. तुळशीची पाने, पिवळी फुले, फळे, पिवळे वस्त्र, धूप, दीप. पिवळ्या रंगाची मिठाई किंवा सात्विक पदार्थांचा नैवेद्य.
advertisement
पूजा विधी: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. व्रताचा संकल्प करून भगवान विष्णूंचे पूजन करावे. भगवान विष्णूंना जल, पंचामृत, चंदन आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यावर पुत्रदा एकादशीची कथा वाचावी. शेवटी आरती करून उपवास करावा. एकादशीला भात खाऊ नये. दुसऱ्या दिवशी द्वादशीला व्रत सोडावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 8:03 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: मंगळागौरी पूजन आणि पुत्रदा एकादशीचा शुभ संयोग; घरात या पूजा उपायांनी येईल समृद्धी


