Beed Crime: बीडमध्ये कायद्याचा खेळखंडोबा! अपहरण करून झाडाला बांधलं, बेदम मारहाणीत तरुणाने जीव गमावला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Beed Crime News : बीडमध्ये अपहरण करुन मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल होत असताना आणखी एका धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न मागील काही घटनांवरून उपस्थित होत आहे. बीडमध्ये अपहरण करुन मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल होत असताना आणखी एका धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील भाटूंबा या गावात अमानुष घटनेने खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे या तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून निर्घृण मारहाण करण्यात आली. या गंभीर मारहाणीमुळे जखमी झालेल्या धपाटे याला तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी (27 मे) उघडकीस आली असून, याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेतलं असून, घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे एका विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी त्याचे अपहरण करून गावाशेजारील झाडाला बांधून बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
advertisement
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सात आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी खबरदारी म्हणून गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 27, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Beed Crime: बीडमध्ये कायद्याचा खेळखंडोबा! अपहरण करून झाडाला बांधलं, बेदम मारहाणीत तरुणाने जीव गमावला









