'माझ्याकडे पाहून का थुंकला', जळगावच्या बिलवाडी गावात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Jalgaon Crime: शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून वाद घातला होता.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव: जळगावजवळील बिलवाडी गावात रविवारी सकाळी झालेल्या हाणामारीत एकनाथ निंबा गोपाळ (वय 45) यांचा मृत्यू झाला असून दोन्ही गटातील एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोपाळ आणि पाटील या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद सुरू होता. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून वाद घातला होता. या बाचाबाचीचे वेळेत नियंत्रण मिळवण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आले. त्यावेळी “माझ्याकडे पाहून का थुंकला?” या किरकोळ कारणावरून वाद चिघळला. काही क्षणांतच वाद उग्र रूप धारण करून हाणामारीत बदलला.
advertisement
एकाचा मृत्यू 11 जण जखमी
लाकडी दांडे, पावड्या व अन्य बांधकाम साहित्याचा वापर करून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. इतर 11 जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे.
तातडीने घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केला. “जोपर्यंत गुन्हेगारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
advertisement
मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
रुग्णालय परिसरात गोंधळ उडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. जुन्या वादातून उफाळलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
advertisement
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 14, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'माझ्याकडे पाहून का थुंकला', जळगावच्या बिलवाडी गावात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू