तुमच्याकडे ‘ही’ कार आहे का? परदेशातील हॉटेलमध्ये 10 दिवस..., भन्नाट स्कीम अन् भयानक कांड
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik News: नामांकित ऑटोमोबाईल कंपनीची कार वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास मेंबरशिप प्लॅन असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक: "तुमच्याकडे नामांकित कंपनीची कार आहे का? मग तुम्हाला 15 वर्षे जगातील कोणत्याही हॉटेलमध्ये दरवर्षी 10 दिवस मोफत मुक्काम मिळेल!" अशा आकर्षक स्कीमच्या जाळ्यात ओढून नाशिकमधील एका 63 वर्षीय ज्येष्ठाला तब्बल 2 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई नाका परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये हा फसवणुकीचा डाव रचण्यात आला होता.
नेमकी घटना काय?
टिळकवाडी येथील रहिवासी सुनील पाटील (63) यांना संशयित आरोपींनी फोन करून मुंबई नाका परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलावले. तिथे 'क्लब रिसॉर्ट व्हॅकेशन' नावाच्या खाजगी कंपनीच्या प्रतिनिधींनी पाटील यांना गाठले. संशयितांनी पाटील यांना सांगितले की, ठराविक नामांकित ऑटोमोबाईल कंपनीची कार वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही खास मेंबरशिप आहे. या मेंबरशिपअंतर्गत पुढील 15 वर्षे जगातील कोणत्याही कोपऱ्यात वर्षातील 10 दिवस विनामूल्य राहण्याची सुविधा मिळेल. या 'भन्नाट' स्कीमवर विश्वास ठेवून पाटील यांनी सभासदत्वासाठी 2 लाख रुपये दिले. मात्र, पैसे दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 'क्लब रिसॉर्ट व्हॅकेशन' कंपनीच्या संचालक मंडळातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कपिल सिंग, अपर्णा चौहान, रविकुमार सिंग, अभिषेक गौतम व इतर साथीदार आहेत.
सुनील पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक गोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारच्या अमिषांना नागरिकांनी बळी पडू नये, कोणत्याही आकर्षक ऑफर्स किंवा मोफत सुविधांच्या नावाखाली पैसे भरण्यापूर्वी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 6:06 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तुमच्याकडे ‘ही’ कार आहे का? परदेशातील हॉटेलमध्ये 10 दिवस..., भन्नाट स्कीम अन् भयानक कांड











