gondia: गणेश चतुर्थीच्या दिवशी दुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 2 आणि 3 वर्षांच्या सख्ख्या भावांचा मृत्यू
- Published by:sachin Salve
Last Updated:
पुजारी सुजित दुबे यांचे दोघे चिमुकले रुद्र आणि शिवम सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले.
रवी सपाटे, प्रतिनिधी
गोंदिया: राज्यासह देशभरात गणरायाचं आगमन झालं आहे. मात्र, गोंदियामध्ये आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गोंदियाच्या जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घराशेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्याने 2 चिमुकल्या सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र सुजित दुबे (वय 3) आणि शिवम सुजित दुबे (वय 2) दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी मृतांची नावं आहेत. हिरडामाली इथं पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो. त्या नाल्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहते. देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोघे चिमुकले रुद्र दुबे आणि शिवम दुबे शुक्रवारी सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले. पाण्यात खेळण्याचा मोह चिमुकल्यांना आवरला नाही. यातच पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळता खेळता चिमुकल्यांचा पाय घसरल्यानं दोघेही चिमुकले पाण्यात वाहून गेले.
advertisement
शुक्रवारी रात्री गोरेगाव पोलिसात या संदर्भात वडील सुजित दुबे यांनी मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही दोघे चिमुकले सापडले नाही. आज शोधकार्य सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळले. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसात करण्यात आली आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे दुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
September 07, 2024 5:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
gondia: गणेश चतुर्थीच्या दिवशी दुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 2 आणि 3 वर्षांच्या सख्ख्या भावांचा मृत्यू