Ajit Pawar Death Case: अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, राज्य सरकारने दिले महत्त्वाचे आदेश
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash : लाडक्या 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागराचा महापूर लोटला होता. दरम्यान, या भीषण विमान दुर्घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. लाडक्या 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागराचा महापूर लोटला होता. दरम्यान, या भीषण विमान दुर्घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारने आता सीआयडी (CID) चौकशीचे आदेश दिले असून, तपासाचा रोख तांत्रिक बिघाड आणि 'त्या' शेवटच्या २५ मिनिटांकडे वळला आहे.
बारामती 'दादां'च्या आठवणीत हळहळली
बुधवार, २८ जानेवारी रोजी झालेल्या या भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. गुरुवारी बारामतीमध्ये हजारो समर्थकांनी 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणा देत आपल्या नेत्याला निरोप दिला. या दुःखद प्रसंगी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून जनजीवन अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाही.
advertisement
राज्य सरकारकडून CID चौकशीचे आदेश
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सरकारने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या अपघातातील गूढ उलगडण्याची आणखी दाट शक्यता आहे. बारामती पोलिसांनी अपघातस्थळाची तटबंदी केली असून, कोणालाही तिथे प्रवेश करण्यास मनाई आहे. फॉरेन्सिक पथकाने विमानाचे अवशेष आणि जळालेल्या भागांचे नमुने आधीच ताब्यात घेतले आहेत. बारामती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 'अकस्मात मृत्यू' (ADR) अहवालाच्या आधारे आता सीआयडी सखोल तपास करणार आहे.
advertisement
हे मु्द्दे ठरणार कळीचे?
सीआयडी तपासात आता वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामानातील अचानक बदल आणि एटीसीशी झालेला शेवटचा संवाद यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या एका महत्त्वाच्या नेत्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने यामागे काही घातपात तर नाही ना, या दिशेनेही सर्व शक्यता तपासून पाहिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Death Case: अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, राज्य सरकारने दिले महत्त्वाचे आदेश









