माझंच नाव चेअरमन म्हणून का जाहीर केलं? गुलाल उधळताच अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: माळेगाव निवडणुकीतील विजयानंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आणि सभासदांच्या आभार सोहळ्याचे आयोजन आज बारामतीमधील माळेगावात करण्यात आले.
माळेगाव (बारामती) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी, शरद पवार गटाशी जुळवून घेण्याची भूमिका आणि स्थानिक नेत्यांच्या बोलाचालीनंतरही चर्चांना यश न आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्यात वेगळा पॅनेल उभा करावा लागला. पुढे निवडणूक प्रचारात माळेगावचा पुढचा चेअरमन मीच असेल अशी थेट घोषणाच अजित पवार यांनी करून स्वपक्षातील स्थानिक नेत्यांनाही धक्का दिला. अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असूनही त्यांना माळेगावचे चेअरमन का व्हायचे आहे? अशी चर्चा संपूर्ण राज्यभर झाली. त्यांच्या याच राजकीय खेळीमागचे स्पष्टीकरण त्यांनी माळेगाव सभासदांच्या आभार मेळाव्यात दिले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नीळकंठेश्वर पॅनेलने प्रतिस्पर्धी तावरे गटाला २०-१ असे अस्मान दाखवले. निवडणुकीतील विजयानंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आणि सभासदांच्या आभार सोहळ्याचे आयोजन शनिवारी बारामतीमधील माळेगावात करण्यात आले. या सोहळ्याला स्वत: अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या भाषणात निवडणूकपूर्व युती-आघाड्यांच्या चर्चा, उमेदवारांची निवड, राज्याच्या प्रमुखांची मध्यस्थी तसेच स्वपक्षातील नेत्यांची चेअरमनपदासाठीची स्पर्धा असे विविध विषय होते. अजित पवार यांची ओळख रोखठोक बोलणारे आणि मनात आडपडदा न ठेवता समोरच्याला अगदी स्पष्टपणे 'होय किंवा नाही' सांगणारे नेते अशी आहे. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती माळेगावकरांना पुन्हा एकदा आली.
advertisement
माझंच नाव चेअरमन म्हणून का जाहीर केलं? अजितदादांचा गौप्यस्फोट
अजित पवार यांनी स्वत:चे नाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी का जाहीर केले असावे? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अगदी थेटपणे दिले. ते म्हणाले,माझ्या राजकीय आयुष्यात मी कधीही कारखान्याची निवडणूक गांभीर्यपूर्वक घेतली नव्हती. परंतु पहिल्यांदाच माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी जातीने लक्ष घातले. माळेगावात तावरे मंडळी असल्याने मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु अण्णांच्या उत्तराने तो अयशस्वी झाला. सुरुवातीला माझ्या मनात मला कुठेही संचालक व्हायचे किंवा अध्यक्ष व्हायचे असे काही नव्हते. मात्र माझ्याच जवळच्या सहा ते सात लोकांना चेअरमन व्हायचे आहे, असे मी ऐकले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रणनीतीही आखल्या होत्या. माझ्याच जवळच्या सहा-सात लोकांना चेअरमन व्हायचे असल्याने नाईलाजाने मला माझे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर करावे लागले, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
advertisement
पुढील पाच वर्षे मीच चेअरमन, कुणाच्या डोक्यात काही असेल तर आत्ताच काढून टाका
तसेच पुढील पाच वर्षे मीच चेअरमन असेल. कुणाच्या डोक्यात काही असेल तर आत्ताच काढून टाका, उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका, असे सांगत संचालकांच्या मनातील भावी चेअरमनपदाची आशाही अजितदादांच्या बोलण्याने मावळली.
अजित पवार यांनी गावपुढाऱ्यांची शाळा घेतली
advertisement
इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगतो, राजकीय पुढारी माझ्या सोबत नसतात. पण बारामतीचे सामान्य नागरिक मात्र माझी साथ सोडत नाहीत. पद दिले तरच 'दादा लय भारी' असे पुढाऱ्यांचे असते. कारखान्याच्या निवडणुकीत तर अनेकांनी प्रचारासाठी आपापल्या माणसांनाही घराच्या बाहेर काढले नाही. पण मी हे सगळे पाहत होतो. कुणी कुणी क्रॉस व्होटिंग हे पण मला माहिती आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी गावपुढाऱ्यांची शाळा घेतली.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
June 28, 2025 6:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझंच नाव चेअरमन म्हणून का जाहीर केलं? गुलाल उधळताच अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट